पुणे : पतंगाचा महोत्सव म्हणून साजरी केली जाणारी संक्रात १५ दिवसांवर आली आहे. देशभरात संक्रात पतंग उत्सव म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रातही तीळगूळ आणि पतंगाला महत्व असले तरी गेल्या दोन, तीन वर्षात हा पतंग महोत्सव कालबाह्य होत असल्याचे चित्र आहे.
चायनीज मांजाने होणाऱ्या अपघातांमुळे मांजा विक्रीवर बंदी आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विक्रेत्यांनी पतंग अन् मांजानेच अपघात होतात का, असा सवाल उपस्थित केला आहे. तर साध्या दोऱ्याने पतंग उडवावे, असा पर्याय पक्षीमित्रांनी सुचवला आहे.
पुणे शहरात कॅम्प परिसर, रविवार पेठ, बोहरी आळी, स्वारगेट अशा भागात पतंग आणि मांजाची दुकाने आहेत. गेल्या २० ते ३० वर्षांपासून या विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू आहे. परंतु या पतंग महोत्सवात चायनीज मांजाची एंट्री झाली अन् उत्सवावर विरजन आले. विक्रेते मांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री करू लागले. त्यामुळे पक्षी आणि माणसांचे अपघात होऊ लागले. नागरिकांचे जीव गेल्यावर सरकारने चायनीज मांजावर बंदी आणली. त्यानंतरही होणाऱ्या अपघातात चायनीज मांजा आढळून आला.
बाजारात सध्या काय उपलब्ध?
पुण्यात गुजरात, उत्तर प्रदेशवरून पतंग आणि मांजा दाखल होतो. लॉकडाऊनमध्ये कारखान्याचे प्रमाण कमी झाले तरी दोन्हींची कमतरता भासली नाही. सद्यस्थितीत बाजारात ३ रुपयांपासून पतंग उपलब्ध आहेत. तर जाड - बारीक एक कांडी मांजाची विक्री शंभर रुपयांपासून होत आहे. पण चायनीज मांजा उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
विक्रेते काय म्हणतात
नागरिकांना हवा तसा मांजा न मिळाल्यास ते फक्त पतंग घेऊन जातात. काही जण चायनीज मांजाची चौकशी करत असल्याने आम्ही दुकानात ‘नो चायना मांजा‘ असा बोर्ड लावला आहे. पण जाड आणि बारीक मांजावरही बंदी आणली जात आहे.
साधा दोरा हाच पर्याय
विक्रेते चायनीज मांजा विकत नाही, असे सांगत असले तरी दरवेळी होणाऱ्या अपघातात हाच मांजा कुठून येतो, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे साध्या दोऱ्यानेच पतंग उडवावेत, असा पर्याय पक्षीतज्ज्ञ धर्मराज पाटील यांनी सुचवला.
वाहनचालकांचा जीव मुठीत
शहरात काही भागांत मुले रस्त्यावर पतंग उडवतात. त्यामुळे या भागातून जाणाऱ्यांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. आता या मुलांची तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
''एकेकाळी आम्हाला या महिन्यात बसायलाही वेळ मिळत नसे. आता संक्रांत जवळ आली तरी विक्री थंडावली आहे. लहान मुले मोबाईलमध्ये मग्न असल्याने आता दुकानात आम्हालाही मोबाईल घेऊनच बसावे लागते. काही वर्षांनी पतंग व्यवसाय कालबाह्य होईल असे विक्रेते मुझफर सय्यद यांनी सांगितले.''