पुणे : मकरसंक्रांतीच्या दिवशी अनेक नागरिकांनी म्हातोबा टेकडीवर नायलॅान मांजाचा वापर करून पतंग उडविले. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वन विभागातर्फे कोणीही आले नाही. हे मांजा तेथील पक्ष्यांना घातक ठरू शकतात. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली. वन विभागाने त्या ठिकाणी कर्मचारी नेमून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक होते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात नायलॅान मांज्यामुळे नागरिकांचे जीव गेले आणि काही जखमी झाले आहेत. पक्षीदेखील त्यात अडकून जखमी होतात आणि त्यांचा जीव जातो. खरंतर या नायलॅान मांज्यावर बंदी आहे. तरीदेखील अनेक ठिकाणी तो विकला जातो आणि नागरिक त्याचा वापर करतात. शहरात अनेक टेकड्या असून, त्यावर आज पतंगबाजी झाली. त्यात अनेकांनी नायलॅानचा मांजा वापरल्याचे दिसले. परंतु, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेकडीवर वन विभागातर्फे कोणीच हजर नव्हते. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. किमान उद्यापासून तरी टेकड्यांवर पतंग उडविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वन विभागाने कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.