बारामती - पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात आता ‘पतंग वॉर’ रंगणार आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध प्रकारचे पतंग दाखल झाले आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी व राहुल गांधी यांच्या छायाचित्रासह पतंगावर ‘किसमें कितना है दम?’ अशा शब्दांत आव्हान दिलेल्या पतंगांना मोठी मागणी आहे. विशेषकरून तरुणवर्गाकडून अधिक मागणी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.बुधवारी स्वातंत्र्य दिन व नागपंचमी असा दुहेरी सणांचा आनंदोत्सव आहे. नागपंचमीनिमित्त बाजारपेठेत वेगवेगळे पतंग विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या आकार, रंगांपासून बॉलिवूड, राजकीय संघर्षाचेदेखील प्रतिबिंब या पतंगांमध्ये उतरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एकमेकांना या पतंगांमधून ‘दम’ दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच, बच्चेकंपनीच्या भावविश्वातील छोटा भीम, मोटू-पतलू, बार्बी गर्ल, टॉम अँड जेरी, स्पायडरमॅन, मिकी माऊस, डोनाल्ड डक, डोरेमॉन आदी कार्टूनची चित्रे असणाऱ्या पतंगाला मागणी वाढती आहे.कागदी पतंग, प्लॅस्टिक पतंग, जिलेटीन पेपरचे पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अगदी २० रुपयांपासून १८० रुपयांपर्यंत पतंगाचे दर आहेत. तर, होलसेल विक्रीसाठी १०० रुपये शेकडा ते ६०० रुपये शेकडापर्यंत पतंग विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत.यंदा वेगवेगळ्या प्राण्यांच्याव पक्ष्यांच्या आकारात असणारे कापडी चिनी पतंगांची मागणीअभावी आवक घटली आहे. भारतीय पारंपरिक पतंगालाच मागणी असल्याचे विक्रेते सनी भारत गालिंदे यांनी सांगितले.प्राणी, पक्षी इतकेच काय; परंतु माणसांच्या जिवावर बेतलेला चिनी मांजा बाजारपेठेतून यंदा प्रथमच पूर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुती मांजाला मागणी वाढली आहे. बाजारपेठेत प्रत्येक दुकानात ‘येथे चिनी मांजा विकला जात नाही’ अशा पाट्या लागल्या आहेत. विक्रेत्यांनीच चिनी मांजाची विक्री थांबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पोलिसांनी त्यासाठी तपासणी सुरू केली आहे. त्याचाही चिनी मांजाची विक्री बंद होण्यासाठी मदत होत आहे. सुती दोºयाची गुंडी ५ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत आहे. तर, दोरा गुंडाळण्यासाठी लागणारी आसारी ६ रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे विक्रेते रफिक कासम अत्तार यांनी सांगितले.
नेत्यांमध्ये रंगणार ‘पतंग वॉर’, बारामतीत पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्या छायाचित्रांचे पतंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 1:00 AM