पुणे : स. प. महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य आणि शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे माजी चिटणीस उल्हास निळकंठ किवळकर (वय ६६) आणि त्यांच्या पत्नी सौख्यदा (वय ६१) यांचे तीन दिवसांच्या अंतराने कोरोनामुळे निधन झाले. किवळकर वाणिज्य शाखेचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.
उल्हास आणि सौख्यदा यांना त्रास होऊ लागला. उल्हास यांना दीनानाथ रुग्णालयात, तर सौख्यदा यांना शिवाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सौख्यदा यांचे १३ एप्रिलला, तर उल्हास यांचे १६ एप्रिलला निधन झाले. किवळकर यांचा मोठा मुलगा अमित, त्याच्या पत्नी अश्विनी तसेच दुसरा मुलगा कुणाल या तिघांनाही कोरोनाची लागण झाली होती. अमित आणि कुणाल यांना उपचारासाठी ससूनमध्ये दाखल केले होते. ते आता सुखरूप आहेत.
किवळकर लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवाजीमंदिर शाखेचे स्वयंसेवक होते. त्यांनी आणीबाणी विरोधात सत्याग्रह केला होता. ते संघाच्या पद्मावती भागाचे संघचालक होते, अशी माहिती संघाचे नगर कार्यवाह श्रीपाद जोशी यांनी दिली.
दरम्यान, आई आणि बाबा दोघेही गेल्याचा मुलांना धक्का बसला आहे. आम्ही त्यांना आधार देऊ शकलो नाही. त्यांना शेवटचे पाहता आले नसल्याची भावना अमित किवळकर यांनी व्यक्त केली. आईची अँजिओप्लास्टी झाली होती. तिला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले; पण तिची चाचणी निगेटिव्ह आली. रुग्णालयात आम्ही आईजवळच होतो. नंतर बाबांना त्रास होऊ लागला आणि पाठोपाठ आईला, मला आणि माझा भाऊ कुणाललाही लक्षणे जाणवू लागली. आई गेल्याची कुणकुण बाबांना लागली असेल. त्यामुळे ते खचले आणि त्यातच ते गेले असावेत, असे त्यांनी सांगितले.