कोरेगाव भीमा : सणसवाडीसह औद्योगिक परिसरातील व्यापाऱ्यांना, नागरिकांना व कामगार वर्गाला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दमदाटी करून मारहाण करीत लुटणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात नुकतेच शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. अन्य चौघांचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत डेक्कन चेंबर आॅफ कॉमर्स या कारखानदारांच्या संघटनेनेही मागील महिन्यात टोळी पकडण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.नीलेश पगारे व अमोल पेढारे (रा. सणसवाडी, ता. शिरूर) अशी झालेल्या आरोपींची नावे आहेत. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गावांमध्ये नागरिकांना लोकवस्तीपासून दूर नेऊन लुटणारी टोळी खूप दिवसांपासून परिसरात हैदोस घालत होती. सणसवाडी (ता. शिरूर) येथे एल अँड टी रस्त्याने जाताना रस्त्यात काही जण पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये दबा धरून बसले होते. मोटारसायकलवरून चॉकलेट, गोळ्या, बिस्किटांची होलसेल दुकानात जाऊन विक्री करणाऱ्या मोटारसायकल स्वाराला या टोळक्याने धमकावले. पाळत ठेवून बसलेले पाच जण गाडीतून उतरले व त्यांनी ‘आम्हाला माल घ्यायचा आहे. आमच्यासोबत चला,’ असे म्हणून या विक्रेत्याला गाडीत बसवले व टोळीतील एक जण विक्रेत्याची मोटारसायकल घेऊन मागे आला. गाडीमध्ये बसलेल्या विक्रेत्याला पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याचे खिशातील पैसे व कागदपत्रे काढून घेतली तसेच मारहाण करीत त्याच्याकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली. नंतर कार या विक्रे त्याच्या घराशेजारी घेऊन जाऊन ‘घरातून ५० हजार रुपये देण्यास सांग. कोणालाही काही न सांगता पैसे आण,’ असे सांगितले.या विक्रेत्याने घराकडे आलेल्या व्यक्तीकडे पैसे देण्यास पत्नीला सांगितले. पत्नीने घरातील १७ हजार रुपये दिले. यानंतर आरोपींनी आपला मोर्चा सणसवाडी येथील नरेश्वर मंदिराकडे वळविला आणि ‘उरलेले पैसे लवकर दे, नाही तर घरच्यांना संपवितो,’ अशी धमकी देऊन व या विक्रेत्याचा मोबाईल नंबर घेऊन त्याला तेथेच सोडून दिले दुसऱ्या दिवशी आरोपींनी फिर्यादीला फोन करून पैशाची मागणी करीत धमकी दिल्यानंतर फिर्यादी घाबरून आजारी पडला. त्याने त्याच्या मेव्हण्याला घडलेला प्रकार सांगितला आणि व आरोपींमधील दोघांना ओळखत असल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन या विक्रेत्याने सणसवाडी येथे राहत असलेल्या आरोपींची नावे सांगितली. पोलिसांनी आरोपींवर भा.दं.वि. कलम ३९५, ३६३, ३४१, ३८४, ५०७ आणि हत्यार कायदा कलम ३ (२५) अन्वये गुन्हे दाखल करून पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस नाईक कृष्णा कानगुडे, पोपट गायकवाड, अनिल जगताप, संदीप जगदाळे, विलास आंबेकर, दत्तात्रय शिंदे, तेजस रासकर, बाळासाहेब थिकोणे, हेमंत इनामे यांनी सापळा रचला. आरोपींचे साथीदार असलेल्या चौघांचा शोध घेतला असता, हे चारही आरोपी फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटकेतील आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे तपास करीत असून, या आरोपींना लवकरच जेरबंद करणार असून त्यांच्याकडून इतरही अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता देखील शिक्रापूर पोलिसांनी वर्तवली आहे. (वार्ताहर)शिक्रापूर पोलिसांनी अनेक टोळ्या केल्या जेरबंदपुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर पोलिसांनी गेल्या वर्षभरात एटीएम ग्राहकांना लुटणारी टोळी, बँकेतून पैसे काढूण नेणाऱ्यांना लुटणारी टोळी, बनावट नोटा चलनात आणणारी टोळी, चंदन चोरणारी टोळी व वृद्ध महिलांना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद केले असतानाच परिसरात शिक्रापूर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.अशा चोऱ्यांना आळा घालण्यासाठी नाकेबंदीची कारवाई केली जात आहे. या नाकेबंदीमध्ये सणसवाडीत व्यापाऱ्यांना व नागरिकांना लुटणारी टोळी पकडण्यात यश आले आहे.
चाकू व बंदुकीच्या धाकाने लुटणारी टोळी जेरबंद
By admin | Published: June 05, 2016 3:37 AM