ओतूर (पुणे) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथील जनता कॉलनीत राहणाऱ्या जया राजेंद्र वेताळ (वय ३५) या महिलेवर गुरुवार (दि. १७) रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान राजेंद्र गोरक्षनाथ धोत्रे याने चाकू हल्ला केला. त्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस कर्मचारी सखाराम झुंबड, डुंबरवाडीचे पोलीस पाटील किरण भोर यांनी जाऊन पाहणी केली. राजेंद्र धोत्रे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर ओतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र धोत्रे त्याने काही वर्षांपूर्वी पुणे या ठिकाणी त्याच्या पत्नीचा खून केल्याने तो बरेच वर्षे जेलमध्ये होता. दोन तीन वर्षापूर्वी तो जेलमधून सुटला आहे, तो तेव्हापासून वस्तीवर राहण्यास आला आहे, असे जया वेताळ यांनी फर्यादीत म्हटले.