धायरी: वाहन चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी वाहन मालकाच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केले असल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे घडली. प्रमोद किसन घारे ( वय: ३५, रा. सिद्धी संकल्प सोसायटी, भूमकर चौकाजवळ, नऱ्हे, पुणे) असे जखमी वाहन मालकाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रमोद घारे हे गेल्या आठ वर्षांपासून नऱ्हे येथील सिद्धी संकल्प सोसायटीत राहतात. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पार्किंग मधून कसलातरी आवाज ऐकू येत असल्याने त्यांनी गॅलरीतून खाली पाहिले तेव्हा त्यांना पार्किंगमध्ये त्यांच्या स्विफ्ट गाडी जवळ एक जण व्यक्ती काहीतरी करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी ते खाली पार्किंगमध्ये उतरून गाडीजवळ गेले असता संशयित एक व्यक्ती गाडीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी प्रमोद यांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या दोघांची झटापट पाहून दूर उभ्या राहिलेल्या अन्य तीन अज्ञात चोरट्यांनी प्रमोद यांना पकडुन मारहाण करू लागले. ' तू इथून निघून जा नाहीतर तुला मारून टाकीन आम्ही लय टपकवलेत, आमच्या हातून मरू नकोस ' असे म्हणत ते शिवीगाळ करू लागले. तेवढ्यात त्यातील एका चोरट्याने चाकू काढून प्रमोद यांच्या पोटात दोन वेळा खुपसला. यात ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. यानंतर चोरटे वॉल कंपाऊंडवरून उडी मारून पळून गेले. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.
.............. मागील आठवड्यातही झाली होती चोरी...
प्रमोद घारे राहत असलेल्या सोसायटीत मागील आठवड्यात मोठी घरफोडी झाल्याची घटना घडली होती. त्यावेळीही चार चोरटे सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप येथील रहिवाश्यांनी केला. दरम्यान आज पहाटेही चारजण चोरीच्या उद्देशाने आले असावेत. असे येथील रहिवाश्यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले. आज चोरट्यांनी शिवीगाळ करीत प्रमोद घारे यांच्या पोटात दोनवेळा चाकू खुपसला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ते जखमी अवस्थेत पहाटे साडेतीन पासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत असे पार्किंग मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. पहाटे वॉकिंगला जाणाऱ्या सोसायटीतील तरुणाने त्यांना पाहिल्याने सदर प्रकार उजेडात आला. त्यावेळी ते बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने त्यांनी स्वतःच्या रक्ताने पार्किंगमध्ये ' चार चोर ' असे लिहिले होते. सुदैवाने ते बचावले असून जखमी अवस्थेत असताना प्रमोद यांनी त्यांच्या पत्नीला सांगितल्यावरून त्यांच्या पत्नीची तक्रार दाखल घेण्यात आली आहे. पहाटे आलेले अज्ञात तरुण हे वाहनचोरीच्या उद्देशाने आले होते की अन्य कोणत्या उद्देशाने आले होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.