पुणे : न्यायपालिका हा लोकशाहीचा तिसरा खांब आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रासाठी त्याची निवड करून केवळ आपला चरितार्थ नव्हे, तर मानवतावादी विचार करून आपल्या व्यवसायाचा वापर सामाजिक समस्या सोडविण्यासाठी करावा. सायबर क्राईम सारखी आधुनिक क्षेत्रे समजून घेऊन कायदयाचे ज्ञान अद्यायावत ठेवावे. असे विचार न्या.पी.बी.सावंत यांनी व्यक्त केले.
एमआयटी विश्व शांती विद्यापीठाच्या कॉमर्स, ईकॉनॉमिक्स विभाग आणि स्कूल ऑफ लॉच्या नव्या तुकडीच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एआयसीटीईचे राष्ट्रीय आयटी बोर्डचे सदस्य डॉ. दीपक शिकारपूर, एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आय. के.भट, इंजिनियरिंग व टेक्नॉलॉजी फॅकल्टीचे प्रो-वोस्ट प्रा.डॉ. श्रीहरी होनवाड, कॉमर्स विभागाचे सहयोगी संचालक प्रा.डॉ.महेश आबाळे, प्रा.डॉ. पौर्णिमा इनामदार व प्रा. चेतन भुजबळ हे उपस्थित होते.
न्या. पी.बी.सावंत म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात कायदेविषयक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कायद्याचे पदवीधर हे सिव्हील, क्रिमिनल, सरकारी, इंडस्ट्रीयल, फॅमिली, सायबर, कंज्यूमरअशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रात करियर करू शकतात. त्याचप्रमाणे इन्कमटॅक्स, ह्यूमन, चॅरिटी, कंपनी लॉ व कॉर्पोरेट लॉ या क्षेत्रात आपले भविष्य उज्वल करता येते. तसेच डिजिटल युगात वाढत्या सायबर क्राइमच्या घटनांमुळे येथेही करियर करू शकतात.कायद्याच्या क्षेत्रात सतत नव नव्या ज्ञानाची भर पडत असते. लॉचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी अभिजात वाड्.मय व मानेसशास्त्राचासुद्धा अभ्यास करावा. त्याने तुमच्या व्यवसायाला मानवतेची जोड मिळेल. वकिलीच्या कोणत्याही क्षेत्राचे तुम्ही सभासद असलात, तरी सामाजिक समस्या सोडविणे हाच तुमचा धर्म आहे.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, रोबोटिक्स, अॅनेलॅटिक्स आणि अॅप डेव्हलमेंट या तीन गोष्टींच्या आधारवर भविष्य निर्भर असेल. रोज बदलत जाणार्या जगात फक्त तंत्रज्ञानच नाही, तर बिजनेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. ऑनलाईन बिजनेस मुळे भविष्यात तुमच्या खिशामध्येच सर्व बिजनेस असेल. त्यामुळे सर्वांना स्मार्ट बनावे लागेल. नवनवीन अॅप निर्मितीवर भर देऊन विद्यार्थ्यांनी उद्यमशील बनावे.