आळंदी : खेड्यांचा शाश्वत विकास हाच खरा सामाजिक विकास आहे. खेडी जर स्वयंपूर्ण झाली तरच शहरातील बकालपणा कमी होईल. नॉलेज- कॉलेज-व्हिलेज ही सहयोगी योजना शाश्वस्त खेड्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते यांनी केले.
आळंदीतील एम.आय. टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उन्नत भारत अभियान विभागामार्फत व डॉ. धनंजयराव गाडगीळ शास्वत ग्रामविकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नॉलेज- कॉलेज - व्हिलेज सहयोग योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार मोहिते - पाटील बोलत होते.
याप्रसंगी डॉ. धनंजराव गाडगीळ शाश्वत ग्रामविकास केंद्राचे समन्वयक डॉ. कैलास बवले, खेड पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, पुणे जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे, प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्य प्रा. अक्षदा कुलकर्णी, डॉ. मानसी अतितकर, कुलसचिव संदीप रोहिणकर आदींसह सिद्धेगव्हाण, मरकळ, चऱ्होली, कोयाळी, सोळू, वडगाव-घेनंद गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. कैलास बवले म्हणाले, खेड तालुक्यात राबविण्यात येणारा पथदर्शी प्रकल्प राज्यातही मार्गदर्शक ठरेल. वास्तविक विद्यापीठे महाविद्यालये यांना एकत्रित काम करण्याची संधी देणारा हा उपक्रम आहे. भारत सरकारच्या उन्नत भारत अभियान उपक्रमाचा हा महत्त्वाचा भाग असून उच्चशिक्षण संशोधन व विस्तारसेवा यांचा ग्रामविकासाला चांगला हातभार लागेल. उपक्रमातूनजी फलनिष्पत्ती होईल ते ज्ञानग्राम होय. दरम्यान प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी उन्नत भारत अभियान विभागमार्फत दत्तक घेतलेल्या गावांमध्ये महाविद्यालयाने केलेल्या कामांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम करगावकर, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी संगीता बोर्डे, शीतल घोटेकर, अरविंद वागस्कर, शैलेन्द्र पाटील, संजय गुंजाळ, प्रवीण खरात, वसंत करमाड, सर्फराज तांबोळी, रणवीर घाटे, संदीप मुळे, ऋतुज देशमुख, पंकज मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर्चन आहेर यांनी तर श्रीराम करगावकर यांनी आभार मानले.
--
२४ आळंदी दिलीप मोहिते
फोटो ओळ : आळंदीतील एम.आय.टी. महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आमदार दिलीप मोहिते. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)