पुणे : सध्या करोनाच्या तणावपूर्ण परिस्थितीत घरातच अडकून पडलेल्या मुलांना केवळ उपजीविकेपुरतीचे शिक्षण ऑनलाईन माध्यमातून दिले जात आहे. मुलांकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग करत त्यांना ज्ञान, मनोरंजन, धैर्य आणि आनंद मिळवून देणाऱ्या चिंटम पिंटम धमाल या ऑनलाईन उपक्रमाचे आयोजन मनशक्ती प्रयोगकेंद्राने केले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. तर सुप्रसिध्द बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी प्रमुख पाहूणे म्हणून यावेळी पालकांशी गप्पा मारल्या.
शनिवारपासून या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाचा शुभारंभ झाला. गोष्टी, गाणी, वैज्ञानिक प्रयोग, मानस प्रयोग, हस्तकला, चित्रकला अशा नानाविध कलागुणांचा मिलाफ साधत तयार करण्यात आलेल्या या अनोख्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना रेणू गावस्कर यांनी मुलांशी त्यांच्या खास शैलीत संवाद साधला. गप्पगोष्टींच्या ओघात मुलांच्या मनात चांगल्या विचारांची रुजवात करणाऱ्या रेणूताईंनी त्यांना जिथे जसे आहात त्या परिस्थितीत गंमत निर्माण करा, असा कानमंत्रही दिला. मुलांनी खूप खेळले पाहिजे. एकमेकांना गोष्टी सांगा, एकमेकांची गाणी ऐका, एकमेकांची चित्रे पहा असे सांगत विचार-कलेच्या या आदान-प्रदानातून आपलं व्यक्तिमत्व घडवण्याचा आग्रहही त्यांनी मुलांकडे धरला. ‘चिंटम पिंटम धमाल’हा उपक्रम ३ ते ७ आणि ८ ते १२ अशा दोन वेगवेगळ्या वयोगटातील मुलांचा विचार करून आखण्यात आला आहे.
मुलांसाठीच्या या उपक्रमात पालकांचीही भूमिका तेवढीच महत्वाची असते. म्हणून मुलांना शिकवत बसू नका तर त्यांना शिकण्याची संधी द्या, असा बहुमोल सल्ला राजीव तांबे यांनी पालकांशी संवाद साधताना दिला. पालकही मुलांबरोबर शिकतील, या शिकण्याच्या आदान प्रदानातूनच समाज पुढे जातो, असा विचार त्यांनी मांडला. मुलांना काय करू नको हे सांगण्यापेक्षा काय करता येईल, हा विचार द्या. त्यांनाही चुकण्याचे स्वातंत्र्य द्या, या शब्दांत पालकांना नवा दृष्टिकोन त्यांनी दिला.