पुणे - भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यात भेट झाली. पुणे येथे सध्या साऊथ आफ्रिका आणि भारत यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यानंतर विराट कोहली आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भेट झाली. यावेळी विराटने संभाजी महाराजांकडे रायगड किल्ला पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
या भेटीवर छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितले की, विराट कोहलीसोबत महाराष्ट्राच्या क्रिकेटवर बोललो. भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य 'जतीन परांजपे' यांनी ही भेट घडवून आणली. आमच्या भेटीआधी जतीननी माझ्या सामाजिक कार्याविषयी आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसाठी मी करत असलेल्या कामाची माहिती विराटला सांगून ठेवली त्यामुळे विराटने स्वतः होऊन रायगड किल्ल्यावर येण्याची इच्छा व्यक्त केली असं त्यांनी सांगितले.
तसेच येत्या काळात 'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन'च्या माध्यमातून भरपूर काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील टॅलेंटेड खेळाडूंना योग्य संधी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितले.
साऊथ आफ्रिका यांच्यासोबत चाललेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शुक्रवारी पुणे येथे नाबाद २५४ धावांची ‘विराट’ खेळी करताना अनेक विक्रम केले. पण एका बाबतीत तर तो सर डॉन ब्रॅडमन वगळता इतर सर्व फलंदाजांमध्ये सरस ठरला आहे. ब्रॅडमन यांची तर तुलनाच होऊ शकत नाही पण त्यांच्यानंतर विराट कोहलीच्याच द्विशतकांचा धडाका सर्वात जलद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाच पेक्षा अधिक द्विशतके करणाऱ्या फलंदाजांची तुलना करता त्याचा हा मोठा पराक्रम समोर आला आहे.
विराटने आपले पहिले कसोटी द्विशतक आपल्या ४२ व्या कसोटीत आणि ७३ व्या डावात केले होते. त्यानंतर त्याने त्यात आणखी सहा द्विशतकांची भर टाकलीय ती फक्त पुढच्या ४० कसोटी आणि ६६ डावात. म्हणजे या काळात जवळपास प्रत्येक सहा कसोटी सामन्याला त्याने एक द्विशतक आपल्या नावावर लावले आहे. विराटने आपली सात कसोटी द्विशतके केवळ तीन वर्ष आणि ८० दिवसांच्या काळात केली आहेत.