पुणे : विधानसभा निवडणुकांमुळे यंदा कोजागरी पौर्णिमा दणक्यात साजरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा दुधाच्या मागणीत वाढ होणार असून, त्यादृष्टीने दूध विक्रेत्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. वाढीव मागणी लक्षात घेऊन दूध पुरवठ्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. शहरात दरवर्षी कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कोजागरीचा आनंद लुटला जातो. त्यामध्ये दुधाला खूप महत्त्व असते. कोजागरी पौर्णिमेनिमित्त चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.मागील काही वर्षांत याला उत्सवाचे स्वरूप येऊ लागले आहे. छोटी-मोठ्या सार्वजनिक मंडळांकडून ठिकठिकाणी मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासाठी सेलिब्रिटीजलाही आमंत्रित केले जाते. त्यामुळे या कार्यक्रमांना गर्दीही वाढू लागली आहे. घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो. त्यातच यंदा विधानसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने कोजागरीचा उत्साह द्विगुणित होण्याची शक्यता आहे. परिमाणी दुधाच्या मागणीतही वाढ होणार आहे.पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक विवेक क्षीरसागर म्हणाले, की दूध संघातून दररोज सुमारे १ लाख ६० हजार लिटर दुधाची विक्री होते. कोजागरी पौर्णिमेला दरवर्षी त्यात सुमारे ५० ते ५५ हजार लिटरची वाढ होते. यंदा निवडणुकीमुळे दुधाची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ ६० ते ६५ हजार लिटरपर्यंत जाऊ शकते. त्यासाठी तयारी करण्यात आली आहे. मागणीनुसार नागरिकांना दूध उपलब्ध करून दिले जाईल. (प्रतिनिधी)
कोजागरी होणार ‘मलईमय’
By admin | Published: October 07, 2014 6:15 AM