कोलवडी गावाशेजारील मोठी लोकसंख्या असणारे व हळूहळू शहरीकरणाकडे झुकलेले केसनंद हे गाव आहे. नेहमीच विविध कारणाने चर्चेत असणारे हे गाव आता प्रदूषणामुळे चर्चेत आलेले आहे.
लोकसंख्या जास्त असल्याने या गावात कचरादेखील मोठ्या प्रमाणात गोळा होत आहे, स्वच्छ सुंदर गाव हे ब्रीद योग्य प्रकारे टिकविण्यासाठी येथील कचरा दररोज गोळा केला जातो व गावाच्या वेशीवर नेऊन जाळला जातो. यामुळे गाव तर स्वच्छ राहत आहे. परंतु शेजारील गावाचे वातावरण मात्र प्रदूषित होत आहे, असे कोलवडी ग्रामस्थांची तक्रार आहे.सध्या कोरोनामय वातावरण असल्याने ग्रामस्थ
अगोदरच भीतीदायक वातावरणात आहेत त्यात मोठ्या प्रमाणात जमा होणारा घरगुती कचरा, प्लॅस्टिकजन्य वस्तू उघड्यावर जाळल्याने होणाऱ्या धुरामुळे गावातील वृद्ध ग्रामस्थांना, तसेच श्वसनाच्या संदर्भात असणाऱ्या
विविध आजाराच्या रुग्णांना या गोष्टींचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. अगोदरच दवाखान्यात ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत आहे, असे जर प्रदूषण राहिले तर आता गावात घरी राहून देखील ऑक्सिजनअभावी रुग्ण
व ग्रामस्थ दगावतील. या गोष्टीला कोणाला जबाबदार धरावे, असा ग्रामस्थांचा प्रश्न आहे. त्याचसोबत हा घरगुती कचरा असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी परिसरात पसरलेली आहे. त्याने देखील विविध आजार ग्रामस्थांना होऊ शकतात. तसेच या भागात शेकडो भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने परिसरातील लोकांसाठी ते अतिशय धोकादायक आहे.
विकास सूर्यकांत गायकवाड (
मा. अध्यक्ष, तंटामुक्त समिती, कोलवडी)
आम्ही ग्रामस्थांनी एकत्र येऊन कोलवडी ग्रामपंचायतीला यासंदर्भात तक्रार अर्ज दिलेला असून, ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी हवेली व प्राथमिक आरोग्य अधिकारी वाघोली यांच्याशी पत्रव्यवहार करून देखील यावर अजूनही काहीच उपाययोजना झालेली नाही
याची दखल घेतलेली नाही. गावागावांत समन्वय राहावा या उद्देशाने अनेकवेळा ग्रामस्थांनी केसनंद पदाधिकारी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून देखील ग्रामस्थांना या प्रदूषणाचा नाहक त्रास होत असून प्रशासनाने त्वरित यावर योग्य ती कार्यवाही करावी.
डॉ. वर्षा गायकवाड
प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली
कोलवडी ग्रामपंचायतीचा तक्रारी अर्ज दि. १२ रोजी आम्हाला मिळालेला आहे. सध्या या ठिकाणी कोविड लसीकरण सुरू असल्याने यामधून वेळ काढून लवकरच आमची टीम तेथील जागेची पाहणी करेल व या समस्येवर काय उपाययोजना करता येईल यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतीशी आम्ही चर्चा करू.
रोहिणी सचिन जाधव
सरपंच, केसनंद
कोलवडी
गावाची समस्या आम्हा सर्व सदस्यांच्या लक्षात आलेली असून या कचरा प्रकल्पासाठी आम्ही जागा शोधत आहे. तसेच, यापुढे तिथे आम्ही कचरा जाळणार नसून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना आम्ही देऊ.
केसनंद ग्रामपंचायतीचा कचरा कोलवडी गावानजीक अशा पद्धतीने उघड्यावर जाळला जात आहे.