लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासांत तीव्र होण्याची व ते पश्चिम -उत्तर पश्चिम दिशेने येत्या २ ते ३ दिवसांत सरकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात येत्या ४ ते ५ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. १३ सप्टेंबर रोजी रायगड तसेच पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. कोकणासह घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
शनिवारी सायंकाळपर्यंत महाबळेश्वर ३१, मुंबई ८, सांताक्रूझ ११, नाशिक १२, लोहगाव १०.६, पुणे ५.७, वर्धा ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी रायगड, रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असून घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
१३ सप्टेंबर रोजी रायगड, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून इतरत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.