महूडे (पुणे): भोर तालुक्यातील कोंढरी, धानवली तर मुळशी तालुक्यातील घुटके गावचे पुनर्वसन करण्यासाठी तसेच या गावांमध्ये नागरी सुविधा मिळण्यासाठी शासनाने प्रत्येक गावासाठी आठ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच दिला आहे. या प्रस्तावास शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. या विषयावरील बैठकीला बुधवारी (दि.२९) रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, प्राजक्ता तनपुरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नियोजन विभागाचे अप्पर सचिव देवर्षी चक्रवर्ती, मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, पुण्याचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भोर तालुक्यातील कोंढरी, धानवली तसेच मुळशी मधील घुटके गावांचे पुनर्वसन होण्यासाठी २ वर्षांपासून सर्वेक्षण होत आहे. या गावांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येकी ८ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून या तिन्ही गावांचे पुनर्वसन तात्काळ करण्याची मागनी आमदार संग्राम थोपटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत मागणी केली. माळीण व महाड गावांवर वेळ आली तशी या गावांवर वेळ येऊ नये असेही आ.थोपटे यांनी या बैठकीत बोलून दाखवले. त्यावर खास बाब म्हणून या गावांचे पुनर्वसन तातडीने व्हावे असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा. अशा सूचना संबंधित अधिकाऱयांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या कपारी खोल दरीत लागून वसलेल्या वरची धानवली व खालची धानवली यांचे पुनर्वसन करण्यात यावे. त्यांच्या नागरी सुविधा करिता २५ कोटी ४७ लाख व थेट जमीन खरेदीसाठी २ कोटी १० लाख तर कोंढरी जमीन खरेदीसाठी ४८ कोटी ७५ लाख तर मुळशी तालुक्यातील घुटके गावच्या जमिनी खरेदीसाठी ८० लाख २० हजार निधी उपलब्ध करण्यात यावा अशी आग्रही मागणी या बैठकीत केली.