पुणे: चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातील आरोपीला कोंढवापोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २०) कमला चौक कोंढवा येथे करण्यात आली. हर्षद सतीश चांदणे (२१, रा – राजीव गांधी नगर, बुद्धविहारा जवळ खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हर्षद मोक्का गुन्ह्यात मागील सहा महिन्यापासून फरार होता. तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर कोंढवा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
हर्षद चव्हाण याच्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक हत्यार बाळगणे, बेकादेशीर जमाव जमवणे यासह क्रिमिनल लॉ अमेडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) अंतर्भाव करण्यात आला आहे. मोक्का कारवाई झाल्यानंतर हर्षद फरार झाला होता. मागील सहा महिन्यापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता.
शनिवारी पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलिस अंमलदार शाहिद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, सूरज शुक्ला, गोरख चिनके व निलेश देसाई हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार सूरज शुक्ला व सुजित मदन यांना माहिती मिळाली की, चतु:श्रृंगी पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी हर्षद चांदणे हा कमेला चौक कोंढवा येथे आलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.