पुणे : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी यंदा एसटी महामंडळाच्या बसकडे पाठ फिरवली आहे. स्वारगेट व पिंपरी चिंचवड कोकणसाठी सोडण्यात येणाऱ्या बस प्रवाशांअभावी रद्द कराव्या लागत आहेत. तसेच कोकणात जाणाऱ्या काही बसमध्येही मोजकेच प्रवासी असतात. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोकणातील अनेक जण रोजगारनिमित्त स्थायिक झाले आहे. यातील बहुतेक जण गणेशोत्सवामध्ये कोकणात जात असतात. त्यांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाकडून दरवर्षी जादा बस सोडल्या जातात. यंदाही रत्नागिरी, दापोली, गुहागर, चिपळूण, खेड आदी ठिकाणी थेट बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. स्वारगेट व चिंचवड येथून 300 ते 400 बस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. दि. 5 ऑगस्ट पासून रात्री 9 नंतर बस सुटणार होत्या. पण पहिल्या दिवशी प्रवासी न मिळाल्याने स्वारगेट येथील बस रद्द कराव्या लागल्या. ऑनलाइन आरक्षणाची सुविधा असूनही 10 टक्केही आरक्षण झाले नाही. त्यांनतर मागील 10 दिवस जवळपास हीच स्थिती आहे. एवढ्या दिवसात केवळ 6-7 बसच कोकणात गेल्या आहेत. चिंचवड भागातून दरवर्षी खूप प्रतिसाद मिळतो. पण यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. आतापर्यंत दररोज 3-4 बस जात असल्या तरी पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. कोरोनामुळे सुरक्षित अंतरासाठी केवळ 22 प्रवाशांना आरक्षण मिळू शकते. पण तेवढी आसने ही भरत नाहीत. दरवर्षी गणेशोत्सव सुरू होईपर्यंत गर्दी असते, असे आगार व्यवस्थापक कांबळे यांनी सांगितले. -------------------------- हंगामात खडखडाट गणेशोत्सव काळात एसटीला चांगले उत्पन्न मिळते. पण आताच प्रवासी मिळत नसल्याने यंदाचा एसटीचा जादा उत्पन्न मिळविण्याचा हंगाम खडखडाटात जाणार असे दिसते. सध्या कोकणात जाणाऱ्या बस परतीच्या प्रवासात रिकाम्या येत आहेत. त्यामुळे जाताना मिळालेले थोडेफार उत्पन्न ही खर्ची पडत असल्याची स्थिती आहे. -------------------------- प्रवाशांअभावी बहुतेकवेळा बस रद्द कराव्या लागल्या आहेत. जाणाऱ्या बस लाही पुरेशी प्रवाशी मिळत नाहीत. केवळ 4-5 प्रवासीच एका बसला आरक्षण करत आहेत, त्यामुळे अशा बस रद्द कराव्या लागतात. रस्त्यात कुठेही बस थांबून प्रवासाची चढ उतार करता येत नाही. - सचिन शिंदे, आगार व्यवस्थापक, स्वारगेट ---------------------------
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण बस मध्ये यंदा 'खडखडाट'; दरवर्षी मिळते भरघोस उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 1:23 PM
स्वारगेट व पिंपरी चिंचवड कोकणसाठी सोडण्यात येणाऱ्या बस प्रवाशांअभावी कराव्या लागत आहेत रद्द
ठळक मुद्देकोरोनामुळे सुरक्षित अंतरासाठी केवळ 22 प्रवाशांना मिळू शकते आरक्षण सध्या कोकणात जाणाऱ्या बस परतीच्या प्रवासात येत आहेत रिकाम्या