पुणे : 'कोकणचा राजा' अशी ओळख असलेल्या आणि जगभराला भुरळ घातलेल्या हापूस आंब्याच्या हंगामाचं गणित यंदा बिघडलं आहे. थ्रीप्स रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस आणि उष्ण वातावरण यामुळे नेहमीच्या तुलनेत हापूसचे उत्पादन केवळ तीस ते चाळीस टक्केच सध्या शिल्लक आहे. अक्षय तृतीय निमित्ताने पुणे, मुंबईसह इतर बाजारपेठांत मोठया प्रमाणात रत्नागिरी, देवगड हापूस आंब्याची मागणी असते. मात्र बाजारात आंब्याचा तुटवडा निर्माण झाल्याने काहीसे भाव वाढले आहेत. सध्या किरकोळ बाजारात एक डझन आंब्याची विक्री ६०० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत विक्री केली जात असल्याने यंदा आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतिच्या आंब्याची चव अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आंब्याची चव चाखता येणे अवघड झाले आहे.
साधारण ऑक्टोबर महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहोर लागण्यास सुरुवात होते. त्यानंतर पुन्हा मोहोर लागण्याची प्रक्रिया काहीकाळ थांबून डिसेंबर ते जानेवारी कालावधीत मोहोर लागतो. ऑक्टोबरच्या मोहराला अवकाळीचा फारसा फटका बसला नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील डिसेंबर, जानेवारीमध्ये येणाऱ्या मोहोरला थ्रीप्सचा मोठा फटका बसला. त्यातच काही प्रमाणात उष्णता आणि अवकाळीमुळेही आंबा कमी झाला. परिणामी यंदा उत्पादन तीस ते चाळीस टक्के सापडले असून, हंगामही लवकर संपेल. यामुळे बाजारात आंब्याला चांगला भाव मिळाला तरी उत्पादनच कमी झाल्याने आंब्याचा तुटवडा जाणवत आहे.हापूसचे प्रतवारीनुसार घाऊक बाजारातील भाव
कच्चे ४ ते ९ डझन - २५०० ते ४००० रुपये
तयार ४ ते ९ डझन -३००० ते ५५०० रुपये
किरकोळ बाजार एक डझन दर : ६०० ते १२०० रूपये
आंब्यावर थ्रीप्सचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. झाडावर कैरीत आलेला आंब्याची गळती झाली. रोग आणि उष्णतेने काही आंब्यावर डाग पडले. परिणामी उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कामगारांचा पगार , बिया, बांगाची देखरेख करणे कठीण होत आहे. बाजारात आंब्याला चांगला भाव मिळत असला तरी उत्पादनच कमी झाल्याने आंब्याच्या पेढया निर्यात करणे शक्य नाही.- मकरंद काणे , आंबा उत्पादक गणपतपुळे रत्नागिरी