कोरेगाव भीमा : हातात झाडू घेत स्वच्छतेचा संदेश देत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या जवळपास १ हजार कार्यकर्त्यांनी कोरेगाव भीमा येथे आज स्वच्छता मोहीम राबवली. गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ असलेला कोरेगाव भीमाचा परिसर अवघ्या काही तासांत स्वच्छ झाला. प्रत्येक नागरिकाने समजाचे व देशाचे ऋ ण फेडणे हीच खरी ईश्वरसेवा मानून स्वच्छ भारत अभियानांतर्गत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यात एकाच दिवशी ग्रामस्वच्छतेचा कार्यक्र म हाती घेतला होता. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या सूचनेनुसार सकाळी प्रतिष्ठानच्या १ हजारांपेक्षा जास्त साधक स्वच्छतेसाठी लागणारी साधने, जेसीबी मशिन, डंपर, ट्रॅक्टर यासारखी उपकरणे घेऊन गावामध्ये सकाळी ६ वाजता एकत्र आले. आठ दिवस आधीपासूनच गावाचा सर्वे करून ज्या ठिकाणी घाणीचे, कचऱ्याचे साम्राज्य आहे अशा सर्व ठिकाणी सकाळपासूनच स्वच्छतेचा कार्यक्रम ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला. सहा-सात तासांत गावाचा चेहरामोहरा बदलून टाकत गावातून २५० टन कचरा फक्त साफ केला नाही तर तो एका ठिकाणी जमा केला. पूर्वी गावात पुलावर आल्यापासूनच दुर्गंधीस होणारी सुरुवात, आज मात्र त्या ठिकाणी कसलाच कचरा पाहण्यास मिळाला नाही.ग्रामस्वच्छतेनंतर गावातील मारुती मंदिरासमोर झालेल्या समारोपप्रसंगी काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष नारायणराव फडतरे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे, सरपंच अनिता भालेराव, उपसरपंच नितीन गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गव्हाणे, रमेश शिंदे, योगेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, सुरेंद्र भांडवलकर, वृषाली गव्हाणे, कल्पना गव्हाणे, आशा काशिद, संगीता कांबळे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, ग्रामसेवक मिलिंद महाले, ग्रामस्वच्छता समिती अध्यक्ष कृष्णाबाई गव्हाणे आदी उपस्थित होते. राजाराम ढेरंगे म्हणाले, धर्माधिकारी प्रतिष्ठानने कोरेगाव भीमामध्ये ग्रामस्वच्छता करून आम्हा ग्रामस्थांसमोर आदर्श निर्माण केला असून, यानंतर ग्रामस्थांच्या माध्यमातून गावामध्ये महिन्यातील एक दिवस ग्रामस्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे. उपसरपंच नितीन गव्हाणे यांनी प्रतिष्ठानचे आभार मानून गाव कचरामुक्त करण्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. आभार सुरेंद्र भांडवलकर यांनी मानले.
कोरेगाव झाले चकाचक
By admin | Published: January 25, 2016 12:56 AM