पुणे : कोरेगाव भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केली.ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी नांगरे पाटील यांनी सर्व दलित संघटनांची बैठक आयोजित केली होती़ या बैठकीत सर्व संघटनांनी प्रशासन, पोलीस यांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेवर तीव्र रोष व्यक्त केला़ त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली़कोरेगाव भीमा येथील घटनेबाबत दलित संघटनांशी चर्चा करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी बैठक बोलाविली होती़ या बैठकीला पोलीस अधीक्षक सुवेझ हक, उपमहापौर डॉ़ सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सर्व दलित संघटनांचे नेते उपस्थित होते़ या बैठकीत दलित नेत्यांनी प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर रोष व्यक्त केला़ त्यांनी सांगितले की, २९ डिसेंबरला वढूला घडलेल्या घटनेत अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता़ त्यानंतर ३० डिसेंबरला कोरेगाव ग्रामपंचायतीने १ जानेवारीला गाव बंद करण्याचा ठराव केला़ हा ठराव असंसदीय असल्याने त्याची माहिती मिळाल्यानंतरही प्रशासनाने व पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही़ सोशल मिडियावर १ जानेवारीला जमायचे असे संदेश फिरत होते़ तरीही त्याकडे दुर्लक्ष केले़ १ जानेवारीला हिंदुत्ववादी कार्यकर्ते झेंडे घेऊन जमावाने निघून २ किलोमीटरपर्यंत चालत आले नगर रोडपर्यंत आले तरीही त्यांना अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही़ सणसवाडी येथे मोडतोड सुरु केल्यानंतर सुरुवातीला बघ्याची भूमिका घेतली़ दलित समाजाचा विश्वास संपादन करायचा असेल तर संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि आनंद दवे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत़ त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी़ या भागातील सर्व व्हिडिओ फुटेज तपासावे़ तेथील मोबाईल टॉवरची माहिती घेऊन कोण कोणाशी संपर्कात होते, याची माहिती घ्यावी़ व्हिडिओत दिसतात, त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी दलित संघटनांच्या वतीने करण्यात आली, असे डॉ़ धेंडे यांनी सांगितले़विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, या घटनेचा पारदर्शक तपास होईल, आपल्याकडे जे काही इनपुट असेल, ते पोलिसांना द्यावेत़ पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी दलित संघटनांमधील १० जणांची समिती स्थापन करु़ ते पोलिसांना मदत करतील़ लोकांकडे असलेले मेसेज, व्हिडिओ याचे इनपुट देण्यासाठी त्यांनी एक मोबाईल क्रमांकही (८२०८७४६४०८) यावेळी सर्वांना दिला़ त्यावर माहिती पाठविण्याचे आवाहन केले़कोरेगाव भीमा प्रकरणात शांतता राहावी आणि चर्चा करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बैठक बोलावली होती. दंगली प्रकरणी आतापर्यंत दोन्ही समाजातील ४३ जणांना अटक केली आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, त्यानुसार तपास सुरू आहे.- सुवेझ हक, पोलीस अधीक्षकया समन्वयासाठी समितीमध्ये माझ्याबरोबर भारिप-बहुजन महासंघाचे म. ना. कांबळे, बीएसपीचे रमाकांत खंडे, विजयस्तंभ समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, अॅड. मखरे यांच्यासह वढू आणि कोरेगाव येथील दोन ग्रामस्थ, वकील यांचा समावेश असणार आहे.- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर
कोरेगाव भीमा प्रकरण : पारदर्शक तपासासाठी समन्वय समिती - विश्वास नांगरे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:40 AM