Koregaon Bhima Case ( Marathi News ) : एल्गार परिषद आणि माओवादी संबंध प्रकरणातील आरोपी व मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना अखेर सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. आधी अटकेत असणारे नवलखा हे मागील दोन वर्षांपासून नजरकैदेत होते. गौतम नवलखा यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने नजरकैदेत असताना त्यांच्या सुरक्षेवर खर्च झालेले २० लाख रुपये इतकी रक्कम भरण्याचे आदेशही नवलखा यांना दिले आहेत.
गौतम नवलखा हे आधी अटकेत आणि मागील दोन वर्षांपासून नजरकैदेत असून त्यांच्यावर अद्याप आरोप निश्चिती झाली नसल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं. मुंबई हायकोर्टाने डिसेंबर २०२२ मध्ये गौतम नवलखा यांना जामीन मंजूर केला होता. मात्र राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत आरोप निश्चिती न झाल्याने अखेर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुणे शहरात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत प्रक्षोभक भाषणं करून १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली एकूण १६ जणांना अटक करण्यात आली होती. यातील ५ जण सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.