पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीबाबत आणखी माहिती असल्यास ती त्यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर येऊन सादर करावी. याबाबत आयोगाने त्यांना समन्स बजावावा, अशी मागणी सागर शिंदे यांनी अर्जाद्वारे आयोगाकडे गुरुवारी करण्यात आली आहे.
पवार यांनी १८ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात पोलीस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला आहे, त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. तसेच मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर एक वेगळे वातावरण तयार केले होते, असा आरोपही पवार यांनी केला होता. त्यामुळे न्याय होण्याच्या दृष्टीने आयोगाने पवार यांना समन्स बजावावा तसेच त्यांनी संबंधित माहिती आयोगाकडे जमा करावी, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.