- लक्ष्मण मोरेपुणे - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेले हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याशी कारागृहात एका व्यक्तीची गोपनीय पद्धतीने भेट घडविण्यात आली आहे. याबाबत थेट राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. ही भेट २४ आणि २५ मार्च रोजी घडविली असून संबंधित व्यक्तीला उपमहानिरीक्षक स्वाती साठे या स्वत: कारागृहात घेऊन गेल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ही तक्रार ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी केली आहे.एकबोटेंचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी १४ मार्चला अटक करुन त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. कारागृहात असताना एकबोटेंना भेटण्यासाठी कारागृहाच्या पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे या एका व्यक्तीला घेऊन आल्या होत्या. ही व्यक्ती नेमकी कोण होती, याबाबतची कुठल्याही प्रकारच्या माहितीची नोंदच ठेवलेली नाही. कारागृहात जाताना गेट रजिस्टरला नोंद केलेली नाही. आरोपीला मदत होईल, असे कृत्य साठेंनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.हिरालाल जाधव यांनी केलेल्या तक्रारीविषयी मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही. त्यांचा तक्रार अर्ज माझ्यापर्यंत आलेला नाही. हा तक्रार अर्ज वाचल्यानंतरच मी याविषयी बोलेन.- स्वाती साठे, उपमहानिरीक्षक, कारागृह, पश्चिम महाराष्ट्र
कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : कारागृहात एकबोटेंना कोण भेटले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 4:09 AM