पुणे : माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार तसेच तत्कालिन अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, आयपीएस अधिकारी संदीप पखाले, पुणे ग्रामीणचे तत्कालिन पोलीस अधीक्षक सुवेज हक आणि हर्षाली पोतदार यांच्या महत्त्वपूर्ण साक्ष कोरेगाव भीमा चौकशी आयोग नाेंदवणार आहे, अशी माहिती चौकशी आयोगाचे सचिव व्ही. पळणीटकर यांनी दिली.
मुंबई येथील मलबार येथे शासकीय सह्याद्री अतिथीगृह येथे येत्या २१ ते २५ फेब्रवारी दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५ या दरम्यान चौकशी आयोग सुनावणी घेणार आहे. २३ आणि २४ फेब्रुवारी या दोन दिवस शरद पवार यांची साक्ष नोंदवणार असल्याचे व्ही. पळणीटकर यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचाराबाबत खासदार शरद पवार यांनी ही घटना पूर्वनियोजित होती. तसेच इतर काही वक्तव्य केली होती. त्या अनुषंगाने पवार यांनी सुनावणीत पुरावे तसेच साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे सचिव पळणीटकर यांनी सांगितले.
काेल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालिन पाेलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी हिंसाचाराची घटना घडल्यानंतर पेरणे फाटा येथील विजयस्तंभ व कोरेगाव भीमा येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यामुळे नांगरे-पाटील यांच्याकडे महत्त्वाचे कागदपत्रे अथवा माहिती असू शकते. त्यामुळे त्यांनाही आयोगाचे वकील ॲड. आशिष सातपुते यांनी पुण्यात झालेल्या सुनावणी दरम्यान आयोगाला पत्र देऊन बोलावण्याची मागणी केली होती. नांगरे-पाटील यांच्याकडून २५ फेब्रुवारी रोजी ही कागदपत्रे स्वीकारणार आहे.
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या मुंबईत अशा होणार सुनावण्या...
- २१ आणि २२ फेब्रुवारी :- रवींद्र सेनगावकर, तत्कालिन अपर पोलीस आयुक्त, पुणे- २१ आणि २२ फेब्रवारी :- संदीप पखाले, आयपीएस अधिकारी- २३ आणि २४ फेब्रवारी :- शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खासदार- २३ आणि २४ फेब्रवारी :- सुवेज हक, तत्कालिन पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण- २५ फेब्रवारी :- हर्षाली पोतदार (गरज पडल्यास २६ फेब्रुवारीलाही साक्ष नोंदवणार)- २५ फेबु्रवारी :- विश्वास नांगरे-पाटील, तत्कालिन काेल्हापूर परिक्षेत्राचे पाेलीस महानिरीक्षक