मुंबई : माओवादी 'थिंक टँक' अटक प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना मानवाधिकार आयोगानं नोटीस बजावली आहे. पोलिसांनी या अटकसत्रादरम्यान निर्धारित कार्यपद्धतीचं, नियमांचे योग्य पालन केले नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणलं आहे. अहवालानुसार ही बाब म्हणजे त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचंही म्हटलं आहे.
बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी (28 ऑगस्ट) पहाटे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घातले. या कारवाईमध्ये वारा वारा राव (हैदराबाद), वेरनोन गोन्सालविस, अरुण पाररिया (मुंबई), सुधा भारद्वाज (छत्तीसगड), गौतम नवलाखा यांच्या घरावर छापे टाकून त्यांना अटक केली.
पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या 200 ई-मेलमध्ये या पाच जणांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी यानंतर हैदराबाद, मुंबई, दिल्ली तसेच छत्तीसगडमध्ये या माओवादीचे थिंक टॅक असलेल्यांची माहिती घेतली. ते त्यांच्या घरी असल्याची माहिती झाल्यानंतर मंगळवारी (28 ऑगस्ट) पहाटे एकाच वेळी किमान 5 ठिकाणी छापे घालून झडती घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यांची एल्गार परिषद अथवा कोरेगाव भीमा दंगलीशी संबंध नसून ते बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंधित असल्याचे उघड झाल्याने त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाचा पत्रात उल्लेख?
2018 वर्षांच्या सुरुवातीस पुणे पोलिसांनी कथित स्वरुपात माओवादी नेत्याकडून लिहिण्यात आलेले पत्र जप्त केले होते. या पत्रामध्ये देशात वेगवेगळ्या ठिकाणी घडवून आणण्यात आलेल्या नक्षलवादीकारवायांसाठी कवी वारा वारा राव यांनी कथित स्वरुपात केलेल्या मार्गदर्शनाप्रती त्यांचे कौतुक करण्यात आले होते. कॉम्रेड मिलिंद यांनी लिहिलेल्या पत्रात राव यांचे कौतुक करत ‘वरिष्ठ कॉम्रेड’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
या पत्रात असे म्हटले गेले आहे की, 'गेल्या काही महिन्यांमधील विविध उपक्रमांमध्ये वरिष्ठ कॉम्रेड वारा वारा राव आणि आपले कायदेशीर सल्लागार कॉम्रेड वकील सुरेंद्र गाडलिंग यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपला राष्ट्रीय स्तरावर चांगला प्रचार झाला आहे'
पत्रात नेमके आहे तरी काय?जून 2018 मध्ये माओवाद्यांशीसंबंधीत असलेले एक पत्र समोर आले होते. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजीव गांधी यांच्याप्रमाणे हत्या करण्याच्या कटाची माहिती उघड झाली होती. 18 एप्रिलला कॉम्रेड प्रकाश यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले गेले आहे की, ''हिंदू फॅसिझमला हरवणं आता आवश्यक झाले आहे. मोदींच्या नेतृत्वात हिंदू फॅसिस्ट पुढे जात आहेत, त्यांना वेळीच थांबवणं गरजेचं आहे. मोदींच्या नेतृत्वात भाजपाची 15 राज्यांमध्ये सत्ता आहे. हे अशाच पद्धतीनं सुरू राहिले तर धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे राजीव गांधी हत्याकांडप्रमाणे घटना घडवावी, असा विचार सुरू आहे. जर असे झाल्यास, हा एक सुसाईड अटॅक वाटू शकतो. आपल्याकडे ही एक संधी आहे, असे आम्हाला वाटते. मोदींच्या रोड शोला टार्गेट करणं एक चांगले नियोजन होऊ शकते''.