पुणे: नागरिक पान, तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट अशा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कॅन्सर सारख्या आजारांना आमंत्रण देत आहेत. त्यामुळे त्यांना जीवही गमवावा लागत आहे. भारतात दरवर्षी कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ३० ते ४५ टक्के आहे. अशा परिस्थितीत तंबाखू सेवनाला विरोध करण्यासाठी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाने अनोखा उपक्रम राबवला आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या पान टपरी जवळ जाऊन जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम राबवली होती.
कोथरूड परिसरातील असंख्य मजूर पानटपरी वर तंबाखूजन्य गोष्टींचे सेवन करण्यासाठी येत असतात. त्यांना या उपक्रमातून तंबाखुचे हानिकारक परिणाम सांगण्यात आले. तंबाखूजन्य पदार्थांमुळे घसा, जीभ, आणि आतड्याचा कॅन्सर होतो. कावीळ सारख्या आजाराबरोबरच लिव्हर, किडनी, अन्ननलिकाही निकाम्या होतात. त्यामुळे अल्पवयातच मृत्यूला सामोरे जावे लागते.
नागरिकांनी पान, गुटखा, तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकू नये. परिसरात स्वच्छता ठेवावी. तसेच आपल्या आरोग्याचे रक्षण करून निरोगी आणि सुदृढ शरीर ठेवावे. अस संदेश यावेळी देण्यात आला. तसेच जनजागृती उपक्रमात तंबाखू सम्राटांना गांधीगिरीच्या माध्यमातून गुलाबाचे फुल देऊन तंबाखू न खाण्याची विनंती करण्यात आली. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे, मुकादम वैजिनाथ गायकवाड, बापू साळवे, आणि सदस्य उपस्थित होते.