२ वर्षात चंद्रकांत पाटलांची कोरोना आढावा बैठकांना गैरहजेरी; 'अजित पवार मनाचच करतात...', पाटलांचा कांगावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 07:49 PM2022-01-04T19:49:38+5:302022-01-04T20:22:18+5:30
दोन वर्षांत सर्व कोरोना आढावा बैठकीला कोथरूड आमदार गैरहजर
सुषमा नेहरकर- शिंदे
पुणे :पुणे शहर आणि जिल्ह्यात मार्च 2019 पासून कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाला. शहर, ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) गेले दोन वर्षे काही अपवाद सोडला तर दर शुक्रवारी बैठक घेतात. या बैठकीत बहुतेक सर्व आमदार, खासदार हजर राहून आपल्या मतदारांचे प्रश्न, समस्या बैठकीत उपस्थित करून मार्गी लावतात. परंतु गेल्या दोन वर्षांत कोथरूडचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) एकाही बैठकील उपस्थित राहिले नाही. यामुळे कोथरूडच्या मतदारांचे बैठकीत प्रतिनिधित्व नक्की कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, प्रसार वाढत गेला तसे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीचे महत्त्व वाढत गेले. दर शुक्रवारी न चुकत होणा-या या कोरोना आढावा बैठकीतमध्येच शहरामध्ये नवीन निर्बंध लागू करणे, जम्बो कोविड हाॅस्पिटल, ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिविरचे वितरण, रुग्णांना लावण्यात येणारे भरमसाठ बिले आदी सर्व गोष्टीवर लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यामध्ये खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ या भाजपच्या व आमदार दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार यांच्यासह अनेक आमदार अनेक महत्वाच्या सुचना करतात, सर्वच आमदार आपल्या मतदारसंघात फिरताना येणा-या अडचणी, काय उपाय योजना राबविल्या पाहिजेत यावर बैठकीत चर्चा करतात.
यामधून अनेक वेळा संपूर्ण शहर, जिल्ह्यासाठी निर्णय घेतले गेले. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील गेल्या दोन वर्षांत कोथरूडचे आमदार म्हणून एकाही कोरोना आढावा बैठकील उपस्थित राहिले नाहीत हे विशेष. राज्याचे गृहमंत्री पदाची जबाबदारी असताना दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना देखील दोन्ही मंत्री आवर्जुन कोरोना आढावा बैठकीला उपस्थित राहतात. याशिवाय भाजपचे पुण्यातील इतर सर्व आमदार देखील नियमित उपस्थित असताना, कोथरूडच्या आमदारांची कोरोना आढावा बैठकीला अनुपस्थिती सध्या चर्चाचा विषय ठरला आहे.
बैठकीत कोणतीही भूमिका मांडली तरी अजित पवार त्यांना करायचे तेच करतात, यामुळे बैठकीला उपस्थित राहू वेळ खर्च करण्यापेक्षा मी मतदार संघात लोकांसाठी काय काम करता येईल, याला अधिक प्राधान्य देतो. कोविडसाठी मी लोकांसाठी आवश्यक त्या सर्व उपाय-योजना केल्या. बैठकीत लोकप्रतिनिधी म्हणून कोणतीही भूमिका मांडली तर त्याचा विचार होत नाही. मी बैठकांना उपस्थित न राहताही मतदार संघात सर्व कामे करतो.
- चंद्रकांत पाटील, आमदार, कोथरूड विधानसभा मतदार संघ