पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करुन तिला व तिच्या मित्राला अडवून बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून नेणार्या तिघांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कोथरुडमधील मयुर कॉलनीत सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता घडली. कृष्णा डोंगरे व त्याच्या दोन साथीदारांवर विनयभंग, जबरी चोरी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी डोंगरे याचे फिर्यादी तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. गेल्या काही दिवसांपासून तो तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता. त्याने या तरुणीला प्रेमाबाबत विचारल्यावर तिने त्याला नकार देऊन तू आवडत नसल्याचे वारंवार सांगितले होते. तरीही तो तिचा पाठलाग करत असे.
ही तरुणी व तिचा मित्र १८ एप्रिल रोजी मयुर कॉलनीतील जोग शाळेजवळून जात असताना त्याने व त्याच्या दोन मित्रांनी त्यांना अडविले. त्यांना शिवीगाळ करुन फिर्यादीच्या डोक्यास, पोटास व तिच्या मित्रास हाताला व डोक्यात मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम असा ७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. कोथरुड पोलीस अधिक तपास करीत आहेत.