पुणे : पुण्यात भाजपची ही जागा शंभर टक्के जिंकून येणार होती, केवळ मताधिक्य किती असेल त्याविषयी उत्सुकता होती. ती उत्सुकताही चांगलीच वाढली आणि चंद्रकांत पाटील हे तब्बल १ लाख १२ हजार मताधिक्यांनी कोथरूडचा किल्ला जिंकला. चंद्रकांत पाटील यांना सुरुवातीपासून लीड मिळाले. त्यांचे लीड पाहूनच महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडण्यात आले. विजयानंतर पेढे भरून चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन करण्यात आले.
कोथरूडच्या चंद्रकांत पाटील ज्या वेगाने पुणेकर झाले तो वेग त्यांच्या विजयी होण्यात दिसतो आहे. या निवडणुकीत निवडणुकीच्याही कितीतरी दिवस आधी कोणाचा प्रचार सुरू झाला असेल तर तो पाटील यांचा. कोणाची उमेदवारी सर्वांत आधी जाहीर झाली असेल तर ती पाटील यांची. कोणाचा उमेदवारी अर्ज सर्वप्रथम अर्ज दाखल केला गेला असेल तो पाटील यांचाच. त्यामुळेच की काय मतदान होण्याआधीही भाजपच्या पदरात पडणाऱ्या जागेत जी जागा दाखविली जात होती, तीसुद्धा चंद्रकांत पाटील यांचीच.
कोथरूडमध्ये कसली चुरस अशी झालीच नाही. खरे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे होते, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे चंद्रकांत मोकाटे होते, पण नाव चंद्रकांत पाटील यांचेच झाले. कसब्याच्या पोटनिव़डणुकीत पाटील यांनी हु इज धंगेकर असा प्रश्न आला व ती निवडणूक भाजपच्या हातातून गेली. त्याचा धडा घेत लोकसभेच्या निवडणुकीत पाटील शांत बसले होते व आता स्वत:च्या निवडणुकीतही त्यांनी फारसे तोंड उघडलेच नाही. एकदा बोलले तेही, मला आता फारच जपून बोलावे लागेल इतकेच एक वाक्य.
मतमोजणीत अगदी सुरुवातीपासून पाटील आघाडीवर होते. त्यांनी अखेरच्या फेरीपर्यंत ती आघाडी सोडलीच नाही. मागील पाच वर्षे मंत्रिपदाची जबाबदारी, पक्षाची जबाबदारी अशी सगळी कामे करीत असताना पाटील यांनी मतदारसंघांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. फिरते ग्रंथालय सारखे कोथरूडकरांना भावणारे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी काही गोष्टी केल्या. हे सगळे त्यांना मतरूपातून भरून पावले. मोकाटे, शिंदे यांना कोथरूडकरांनी ते मूळचे तिथलेच असूनही नाकारले व बाहेरचे म्हणणाऱ्या पाटील यांना स्वीकारले. आता ते कसे बाहेरचे ? ते तर पक्के पुणेकर झाले आहे. या विजयाने त्यांच्यावर हा शिक्का बसला आहे.
कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली. त्यानंतर ही आघाडी प्रत्येक फेरीला वाढत गेली. एकूण २१ फेऱ्या झाल्या. त्यामध्ये पहिल्या फेरीत ५८४९ मतांची आघाडी होती. त्यानंतर प्रत्येक आघाडीला ५ हजार मताधिक्य मिळत गेले. शेवटच्या सतराव्या फेरीपासून तर मताधिक्य खूपच वाढले. हे मताधिक्य १ लाख ११ हजार ७४८ एवढे प्रचंड झाले.
मनसेचं काय झालं?
२०१९ च्या विधानसभेत मनसेकडून किशोर शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. आताही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. मागील वेळेस त्यांना तब्बल ७९ हजार मतं मिळाली होती. त्यावेळी इतर पक्षांनी शिंदेंना पाठिंबा देऊनही पाटलांचा ३० हजारांच्या लीडने विजय झाला होता. यावेळी तर उलट चित्र दिसून आले आहे. किशोर शिंदे आणि चंद्रकांत मोकाटे ७० हजार मतांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. शिंदेंना तर केवळ १८ हजार मतं मिळाली आहेत. त्यामुळे मनसेच्या उमेदवारीचा काही फायदा झाला का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
विजयाची कारणमीमांसा कशी कराल?
गेल्या पाच वर्षांपासून कोथरूडच्या जनतेशी माझी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे लाखभराहून अधिक मताधिक्य मला मिळाले आहे. मी कोथरूडकडे पाच वर्षांमध्ये कधीही दुर्लक्ष केले नाही. माझ्यासाठी दररोज शंभर-शंभर कार्यकर्ते काम करत होते. मी राज्यात इतरत्र फिरत राहिलो; पण कार्यकर्ते काम करत होते. त्यामुळे मला खात्री होती की कुठलीही गडबड होणार नाही. कारण, कोथरूडच्या विकासासाठी मी गेल्या पाच वर्षांत बरीच कामे केली आहेत. त्यामुळे कोथरूडकरांनी माझ्यावर पुन्हा विश्वास टाकला असल्याचे पाटलांनी सांगितले.
एवढ्या माेठ्या मताधिक्याची आपल्याला खात्री हाेती का?
खरंतर कोथरूडमध्ये संघटन करण्याला अधिक महत्त्व आहे. संघटन झाल्यामुळे मला लाखभर मताधिक्य मिळाले. कोथरूडकरांची कामे करण्यासाठी मी सदैव होतो आणि पुढेदेखील राहीन. कोथरूडमध्ये माझा विजय निश्चित होता; पण तो किती मताधिक्यांनी येतो, याकडे लक्ष लागलेले होते. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल, याची खात्री होतीच.