पुणे : कोथरूड कचरा डेपोला शुक्रवारी रात्री लागलेली आग सलग तिसऱ्या दिवशी सुरूच होती. रविवारी सकाळपासून भडकलेल्या आगीने मोठे स्वरूप धारण केल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांची दमछाक झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवसभरात आठ ते दहा टँकरचा वापर करण्यात आला. परंतु, रात्री उशिरापर्यंत ही आग विझू शकलेली नव्हती. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी मागणी करूनही मनपाकडून मात्र त्यांना जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. त्यामुळे आग विझवण्यामध्ये अडचणी येत होत्या. कोथरूड कचरा डेपोला शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली होती. ही आग त्यादिवशी पाण्याचा मारा करून विझवण्यात आली होती. परंतु शनिवारी सकाळी पुन्हा आग भडकली. कोथरुड फायर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी २ टँकर, ४ बंबांच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणली. दिवसभर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणल्यानंतरही धग कायम होती. रविवारी सकाळी सातच्या सुमारास आग पुन्हा भडकल्याचा कॉल अग्निशामक दलाकडे आला. परंतु मागील दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी भडकलेली आग मात्र मोठी होती. दिवसभर प्रयत्न करूनही ही आग विझवण्यात यश आले नाही. कचरा डेपोची आग नुसती वर-वर पाणी मारून विझत नाही. आग विझवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने खालचा कचरा वर घेऊन पुन्हा पाण्याचा मारा करावा लागतो. या कामासाठी मनपाकडे जेसीबीची मागणी करूनही अग्निशामक दलाला दिवसभरात जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)
कोथरूड कचरा डेपोची आग तिसऱ्या दिवशीही कायम
By admin | Published: December 14, 2015 12:34 AM