पुणे: पुण्यात मागील काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरू असताना पुन्हा एकदा आग लागल्याची घटना वाघोली येथे घडली आहे. कॉटमट इलेक्ट्रॉनिक प्रा. लिमिटेड या कंपनीच्या गोडाऊनला आज दुपारी भीषण आग लागली. या गोडाऊनमध्ये कंट्रोल पॅनल बनवण्याचे काम केले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर कच्चा मालाचे मटेरियल होते. त्यामुळे आगीने भिषण असे रौद्र रूप धारण केले होते.
वाघोली येथील पीएमआरडीएच्या अग्नीशमन दलाला यांची माहिती मिळताच क्षणी त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. कंपनीचे गोडाऊन मात्र बंद होते. त्यामुळे आग विझवण्यास अडचणी येत होत्या. त्यातून प्रचंड धुराचे लोंढे बाहेर पडत होते. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी एका बाजूने भिंत पाडून आत प्रवेश केला. त्यांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आली.
यावेळी वाघोली अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ,उपस्थानक अधिकारी विजय महाजन, यांनी तीन अग्निशमन वाहनांच्या मदतीने १५ जवानांच्या साह्याने ३ तास अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.