पुणे : वाढत्या उन्हाळ्यात प्राण्यांना उष्णतेचे विकार होऊ नयेत म्हणून कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी कुलर, स्प्रिंकलर्स लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ठराविक वेळेने या प्राण्यांना तलावात डुंबण्यासाठीही बाहेर काढले जाते.
पुण्यातील कात्रज येतेच असलेल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सध्या 6३ प्रजातींचे ४२० प्राणी आहेत. या प्राण्यांना बघण्यासाठी पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. मात्र त्यातही उन्हाळ्यात गर्दीत अधिक वाढ होते. नेमके याच काळात तापमान ४० अंशांचा पारा पार करत असल्याने अनेकदा प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येते. अशावेळी प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातच वाघ, हत्ती, सिंह, बिबट्या, अस्वल या प्राण्यांना अधिक धोका असतो. त्यामुळे त्यांच्या खणदाकामध्ये कुलर आणि फॉगरची सोय करण्यात येते. त्यामुळे वातावरण नियंत्रित राहत असून प्राण्यांना उष्णतेचा त्रास संभवत नाही. हत्तीला दिवसातून तीन वेळा गार पाण्याने अंघोळ घातली जाते. याशिवाय वाघाला पाण्यात डुंबायला ठेवले जाते.तसेच संग्रहालयातील हरीण वर्गातील तृणभक्षक प्राण्यांच्या खंदकाच्या आजूबाजूने सतत पाण्याचे कारंजे सुरु ठेवले जातात. त्यामुळे हिरवळ कायम राहत असून थंडावा निर्माण होतो. उन्हाळ्याचा त्रास फक्त माणसांना नाही तर प्राण्यांनाही होत असतो. गेले काही वर्षे तर तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनामार्फ़त देण्यात आली.