पुणे : सध्या शहरात वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम जोमाने सुरू आहे. यामध्ये पुढील टप्पा पीसीएमसी ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार आहे. या मार्गावर कसबा पेठेतील फडके हौद चौकाजवळ मेट्रो स्टेशन बांधण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेची भाई कोतवाल भाजी मंडईची सुमारे सात गुंठे जागा महामेट्रोला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने सध्या शहरामध्ये वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा दोन मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. याशिवाय लवकरच पुणे महापालिका भवन (पीसीएमसी) ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या मार्गावर बुधवार पेठ भुयारी मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. यासाठी महापालिकेच्या ताब्यात असलेली कसबा पेठ येथील फडके हौद चौकाजवळील भाई कोतावाल भाजी मंडईची ७०० चौ.मी. (७ गुंठे) जागा मागणीचा प्रस्ताव महामेट्रोने महापालिकेकडे केला आहे. या ठिकाणी मेट्रो स्टेशन आणि मेट्रो प्रकल्पबाधित काही कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी ही जागा तातडीने महामेट्रोकडे हस्तांतरित करा, असे लेखी पत्र महामेट्रोने महापालिकेला दिले आहे.