लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील कोतवालांच्या पदोन्नती व सेवा ज्येष्ठतेचा विषय तातडीने मार्गी लावण्यात येतील. इतरही प्रश्नांसंदर्भात बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
पुणे जिल्हा महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. पुणे विभागीय अध्यक्ष प्रवीण घुले, जिल्हाध्यक्ष नामदेव शिंदे, सरचिटणीस संतोष कुंटे, उपाध्यक्ष अमृत धाडगे आदी या वेळी उपस्थित होते.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोतवाल संवर्गामधून गट ‘ड’ चे पदांमधून शिपाई या पदावर शासन निर्णयाप्रमाणे पदोन्नती झालेली आहे. त्यात कोतवालांना मासिक मानधन पंधरा हजार रुपये मिळते. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून मागणी करून देखील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. अनेक कोतवाल सेवानिवृत्त झाले आहेत. सेवा निवृत्तीनंतरचे रजा रोखीकरण बिले त्यांना खूप उशिरा मिळतात. काहीवेळा मिळतच नाहीत. यातून मार्ग काढण्याची विनंती संघटनेने केली.