लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील लसीकरण दोन दिवसांपासून ठप्प आहे. सोमवारी रात्रीही उशिरापर्यंत महापालिकेला लस प्राप्त झाल्या नाहीत. यामुळे आता केवळ प्रतीक्षा करण्याशिवाय कुठलाच पर्याय महापालिकेकडे उरलेला नाही. दरम्यान ज्या नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. त्यांना तरी विहित वेळेत लसीचा दुसरा डोस मिळणे गरजेचे असून, ही लस कधी येणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
पुणे शहरातील ११९ लसीकरण केंद्रांवर गेल्या दोन दिवसांपासून शुकशुकाट आहे. स्थानिक माननीय व त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांना लस नाही, आल्यावर कळवू, हे उत्तर देण्याशिवाय पर्याय उरला नाही. तर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे एकामागोमाग एक फोन राज्याच्या आरोग्य विभागाला जात आहे. लस घेण्यासाठी गाडी कधी पाठवू याबाबत विचारणा होत आहे. मात्र राज्य शासनाकडून लससाठा शिल्लक नसल्याने लस तरी देणार कुठून असा प्रतिप्रश्न करून लस आली की कळवू, असेच उत्तर मिळत आहे.
या सर्व घडामोडीत मात्र सर्वसामान्य नागरिक की, ज्याला कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस शासनाच्या एसओपीनुसार (मार्गदर्शक सूचनांनुसार) २८ दिवसांनी घ्यावा लागणार आहे. अशा २३ हजार ८४३ जणांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस वेळेत मिळणे आवश्यक झाले आहे. यामध्ये बहुतांशी जणांचे पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्णही झाले आहेत. दहा बारा दिवस मागेपुढे या आशेने अनेक जण लसीची वाट पाहत आहेत. यात २ हजार ५१३ हेल्थ वर्कर, १ हजार ९८३ फ्रंटलाईन वर्कर, १० हजार ८२५ जण ४५ ते ५९ या वयोगटातील नागरिक यांचा समावेश आहे़
--
ज्येष्ठ नागरिकांना तरी लस मिळणार का ?
शहरात आजपर्यंत ६० वर्षांवरील ३८ हजार ६६२ ज्येष्ठ नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला गेला आहे. यापैकी २८ हजार ८ जणांना अद्यापही दुसरा डोस मिळालेला नाही. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांकडून वांरवार महापालिकेच्या आरोग्य विभागाला फोन करून दुसरा डोस कधी मिळणार याबाबत विचारणा होत आहे. परंतु, शासनाकडूनच कोव्हॅक्सिन लसचा पुरवठा कधी येईल, याबाबत कोणतीही शाश्वती नसल्याने सर्वच यंत्रणांची कुचंबना झाली आहे.