पिरंगुट : सध्य परिस्थितीमध्ये देशव्यापी कोविड लसीकरणास सुरुवात झाली असताना आता मुळशी तालुकाही यामध्ये सक्रिय झाला असून, मुळशीमध्ये शासकीय तसेच खाजगी डॉक्टर व इतर सह आरोग्य कर्मचारी अशा एकूण १७३४ जणांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार असल्याची माहिती मुळशी तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिली.
शनिवारपासून देशभरात लसीकरणात प्रारंभ झालेला आहे यामध्ये मुळशी तालुक्यातील लवळे येथे असलेल्या सिंबोयसिस हॉस्पिटलमध्ये १०० जणांना तर माले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५६ जणांना पहिल्या दिवशी लस देण्यात आली आहे. तर माले येथील लसीकरण केंद्राचे उद्घाटन हे मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार व पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांच्यासह शासकीय आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
माले प्रमाणेच सिंबोयसेस हॉस्पिटल चे उदघाटन हे सिंबोयसेस विद्यापीठाचे कुलगुरू एस.बी.मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले.तर कोविड-19 लसीकरणाची सुरुवात ही सिंबोयसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय नटराजन यांनी लस घेऊन केली.
मुळशीत पहिल्या टप्प्यात एकूण १७३४ शासकीय तसेच खाजगी डॉक्टर यांच्यासह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांस लस देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. माले येथे ९०४ तर लवळे येथे ९३० जणांना लस देण्यासाठी नोंदणी देखील झाली आहे. तर या सर्वांना मोफत लसीकरण केले जाणार आहे. माले येथे रूबी हॉल हॉस्पिटलचे डॉ.खामकर यांना शनिवारी लस देण्यात आली. तर खाजगी क्लिनिक व हॉस्पीटलच्या डॉक्टर व कर्मचार्यांनाही लवकरच लस दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी यावेळी दिली. लसीकरणासाठी आठ जणांची टीम तयार करण्यात आली आहे.नोंदणी, लस देणे व लस दिल्यानंतर पाहणी करणे यासाठी ही विशेष टीम तयार करण्यात आली आहे. यात एक सुरक्षारक्षकाचाही समावेश आहे, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.
सिम्बायोसिस येथील लसीकरण केंद्रास जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी भेट दिली. त्यांनी भेटीदरम्यान लसीकरणाची पाहणी करत लसीकरण केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चादेखील केली.यावेळी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी अजित कारंजकर,जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, उपसंचालक संजय देशमुख, सहायक संचालक प्रसिद्धी डाॅ. बाविस्कर उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख म्हणाले की,शहराप्रमाणे जिल्ह्यातही लसीकरण सुरळीत सुरू आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर कोणावरही कोणताही वेगळा परिणाम झाला नाही. येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ही लस दिली जाणार असून पुण्यामध्ये ३१ ठिकाणी हे लसीकरण केंद्र सुरू झाले आहेत.
: माले येथील लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर, शासकीय अधिकारी व कर्मचारी
2) सिंबोयसिस येथील लसीकरण केंद्रास जिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी भेट दिली.