पुणे/ किरण शिंदे : मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची चर्चा सुरू आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून हातात कोयते घेऊन दहशत माजवल्याच्या घटना उघडकीस आले आहेत. या कोयता गँगने पुणेपोलिसांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना करूनही दहशत माजवण्याचे हे प्रकार काही थांबताना दिसत नाहीये. त्यानंतर आता राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी स्वतः पुण्यातील या कोयता गँगची दखल घेतली आहे. या गँगचा बिमोड करण्यासाठी स्वतंत्र स्कॉड निर्माण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रजनीश शेठ आज पुण्यात पोलीस क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.
पोलीस महासंचालक म्हणाले, पुण्यातील कोयता गँगच्या दहशतीची दखल पुणे पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. पुणे पोलिसांनी कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी विशेष स्कॉड निर्माण केले आहे. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्याचं काम या पथकाकडून केलं जाणार आहे. राज्यातील रखडलेल्या पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्याबाबतही रजनीश शेठ यांनी महत्त्वाची माहिती दिली. रखडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच केल्या जातील त्यासाठी गृह विभागाकडून पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम असल्याचे सांगत रजनीश शेठ यांनी पोलीस दलाचे कौतुक केले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी कुठलीही घटना 2022 मध्ये घडलेली नाही. पोलीस दलासाठी 2022 वर्ष अतिशय उत्तम राहिले आहे. गडचिरोली गोंदिया या भागात नक्षलवादाविरोधातली कारवाई देखील 2022 मध्ये उत्तम राहिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.