पुणे/किरण शिंदे : हा व्हिडिओ पहा... एखाद्या गल्लीतलं दृश्य.. आजूबाजूला पोलीस.. हातात दोरखंड.. एखाद्या चित्रपटातलं वाटावं असं हे दृश्य... मात्र हे चित्र आहे प्रत्यक्षातलं.. पुण्यातल्या कोंढवा परिसरातलं... समीर शेख आणि शाहिद शेख.. सोबत आणखी तीन अल्पवयीन मुलं...यातल्या समीरला तर नुकतच मिसरूड फुटलं.. मात्र गडी भाई बनत होता.. पूर्वीच्या भांडणातून त्यांनी एका तरुणाच्या हत्येचा कट रचला. हा कट पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी घातक शस्त्र ही आणली होती. मात्र यातल्या एकानं हीच शस्त्र आपल्या सोशल मीडियावर मिरवली आणि त्यांचा हा कट लिक झाला. पोलिसांना मिळाल्यानंतर. या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हत्येच्या कटाचा पर्दाफाश झाला.
त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तेच केले जे सराईत गुन्हेगारांसोबत करायला पाहिजे. समीर आणि शाहीदची कोंढव्यात विशेषतः नवाजीश चौकात दहशत होती. तेथील व्यापारीही या गुंडांना घाबरून होते. घाबरून असलेल्या या व्यापाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, आणि या गुंडांची दहशत मोडण्यासाठी पोलिसांनी त्याच चौकात हलगीच्या तालावर या दोघांची धिंड काढली. रोज धमकावणाऱ्या या गुंडांची अशी अवस्था पाहून व्यापारीही पुढे आले आणि त्यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं.
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. गल्लीबोळातील स्वयंघोषित भाईंच्या हातात कोयते आल्याने किरकोळ घटनांवरूनही हवेत कोयते नाचू लागले. पुणे शहरातील सर्वच भागात या कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असल्याने पोलीसही हैराण झाले होते. सातत्याने वाढत जाणाऱ्या या घटनांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालत कोयता गॅंगचा बिमोड करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडून आले आहेत. गल्लीबोळातील स्वयंघोषित भाईंची धरपकड सुरू आहे. कोयत्याच्या जोरावर भाईगिरी दाखवणाऱ्या या गुंडांना जन्माची अद्दल घडवली जात आहे. ज्या परिसरात हे गुंड राहतात, उठतात, बसतात, तिथेच त्यांची धिंड काढली जात आहे.