पुणे/किरण शिंदे : मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने उच्छाद माजवला आहे. हातात कोयता घेऊन लुटमार करण्याच्या, दिसेल त्याला धमकावण्याच्या, मारहाण करण्याच्या घटना शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्रास घडताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यातील या कोयता गॅंगवर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वशिल्याने झालेल्या पोलिसांच्या बदल्याचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार शहरात घडणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. गुन्हेगारांचे धाडस वाढले हे मलाही मान्य आहे. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ज्या प्रकारे पोलिसांच्या बदल्या झाल्या त्याचाही काही प्रमाणात परिणाम आहे. ज्या वेळा अधिकारी वशिल्याने, ओळखीने येतात तेव्हा ते आपली काम व्यवस्थित केले काय किंवा न केले काय या मनस्थितीत असतात. मात्र देवेंद्र फडणवीस हे सर्व एकेक करून बदलत आहे. पुण्यासाठी पाच नवीन DCP ( पोलीस उपायुक्त) आणण्यात आले आहे. या सर्वांची पार्श्वभूमी स्ट्रॉंग आहे. पुणे शहराची ख्याती ही शांत शहर अशी आहे. त्या दिशेने आपण लवकरच जाऊ.