धायरी (पुणे) : मोटरसायकल हळू चालविण्यास सांगितल्याने झालेल्या भांडणात एकाने थेट लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ केली. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे घडली होती. याबाबत हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सुरज लागींदर ठाकुर (वय २२), नीलेश श्रीराम साह (वय २३), अक्षय सुरेश चव्हाण (वय २३), सागर कांतु पाटील (वय २२), निकुन ऊर्फ अनिकेत विनायक भोर (वय २२, सर्व रा. गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली, जि पुणे) या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी गोऱ्हे बुद्रुक येथील अनिल अडके यांचे व यश संजय जगताप यांच्यासोबत मोटरसायकल हळू चालविण्यासाठी सांगितलेल्या कारणावरून भांडणे झाली. दरम्यान यश संजय जगताप याने त्याचे साथीदार नचिकेत संजय जगताप, सुरज जालिंदर ठाकूर, पंकज दिलीप चव्हाण, अक्षय चव्हाण उर्फ चपाती मोन्या, अनुप शेलार, नीलेश साह, सागर कांतु पाटील, अक्षय पारगे, अनिकेत मोरे, करण शिंदे (सर्व रा. गोरे बुद्रुक, तालुका हवेली जिल्हा पुणे) यांनी बेकायदा गर्दी जमाव जमवून नचिकेत जगताप याने त्याच्याकडील मोठ्या लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून रस्त्याने येणारे -जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ- दमदाटी करून समाजात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण केले.
फिर्यादी महिला व त्यांच्या पतींना शिवीगाळ, दमदाटी केली. फिर्यादीच्या भावालाही जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या आईला हाताने मारहाण करून धक्काबुक्की केल्याने आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार
याप्रकरणी निष्पन्न आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून टोळीतील सदस्यांवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण करणे, खंडणी मागणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आलेला आहे. यापुढेही अशाप्रकारे दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.