जागतिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र प्रयत्नशील - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:13 IST2025-01-16T18:13:33+5:302025-01-16T18:13:45+5:30

तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहिचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकाच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकार पुढे येत असल्याचा आनंद आहे

Krishi Vigyan Kendra is making efforts to bring global technology to the farmers' doorsteps - Sharad Pawar | जागतिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र प्रयत्नशील - शरद पवार

जागतिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र प्रयत्नशील - शरद पवार

बारामती : जगात कृत्रिम बुध्दीमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात बदल होत आहेत. हे तंत्रज्ञान प्रचंड बदल घडवून आणणार आहे. या कृषि क्षेत्रातील बदलाची नोंद घेत हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र प्रयत्नशील आहे. यंदाच्या कृषी प्रदर्शनाचे हे वैशिष्ठ्य आहे. मात्र,यासाठी केंद्र आणि राज्य सरकाच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकार पुढे येत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. बारामतीत अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्रात कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित दहाव्या कृषिकचे उदघाटन गुरुवारी (दि. १६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

 पवार म्हणाले, जगामध्ये शेती क्षेत्रात जे नाविन्यपूर्ण बदल घडत आहेत, नवीन तंत्रज्ञान येत आहे, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी राजेंद्र पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतली आहे. राज्याचे अर्थकारण ऊसावर अवलंबून आहे. पण हे पिक अधिक पाण्याचे असल्याची टीका सातत्याने होते. त्यामुळे हे पिक कमी पाण्यात कसे येईल, त्यातून दर एकरी उत्पादन कसे वाढेल, ऊसात साखरेचे प्रमाण अधिक कसे कसे राहिल याचा विचार करायचा झाला तर एआय तंत्रज्ञान स्विकारावे लागेल. या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात एकर उत्पादन १२० टनापर्यंत मिळू शकते. मायक्रोसाॅफ्ट व आॅक्सफर्डची या कामी मदत घेतली जात आहे. कमी पाण्यावर ऊस उत्पादन,एकरी उत्पादनात वाढ,साखर उतारा वाढविण्यासाठी ‘अेआय’ची मदत घेणे  शक्य असल्याचे पवार म्हणाले. जिरायत शेतकऱ्यांसाठी ज्वारीचे महत्व आहे.या प्रदर्शनात त्याला महत्व दिल्याचे देखील पवार म्हणाले.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या नावाला साजेसे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. पंकजा मुंडे यांनी परळीसोबत बारामतीच्या महाविद्यालयाला मंजूरी दिली. तर अर्थसंकल्पात या दोन्ही महाविद्यालयांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कृषि प्रदर्शन जिल्हा कृषी अधिकारी-तालुका कृषी अधिकाऱ्यांसह साखर कारखान्याच्या ऊसविकास अधिकारी यांनी पहावे यासाठी आदेश काढले जातील. शेतकऱ्यांच्या योजनांसाठी १० मार्चच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येइल. राज्याच्या कृषिविकासासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची गरज भासल्यास मदत घेण्याचे सुतोवाच पवार यांंनी केले.
  
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, शेती विषयात होणारे संशोधन, तंत्रज्ञान, नवीन प्रयोगाचा, तसेच विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहचविणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल. त्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येईल. 

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, सिईंग इज बिलिव्हींग या तत्वाची आज बारामतीत प्रचिती आहे. मी दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व करते. पण येथील चांगल्या बाबी निश्चित मराठवाड्यात राबवेल. बारामतीसारखे काम प्रत्येक तालुका-जिल्ह्यात व्हायला हवे. एआय तंत्रज्ञान शेतीसाठी काय करू शकते, हे येथे पाहायला मिळाले. ट्रस्टचे चे चेअरमन संयोजक राजेंद्र पवार यांनी ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला. वेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करुन गौरविण्यात आले. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन आणि बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार सुळे, विश्वस्त प्रतापराव पवार यांचीही भाषणे झाली. यावेळी  खासदार सुनेत्रा पवार, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे ,आॅक्सफर्डचे संचालक डाॅ. अजित जावकर, नाबार्डच्या व्यवस्थापक रश्मी दराड, महिकोचे चेअरमन राजेंद्र बारवाले, प्रदीप बाराते, पियुष सोनी, डाॅ. महानंद माने आदींची उपस्थिती होती.

Web Title: Krishi Vigyan Kendra is making efforts to bring global technology to the farmers' doorsteps - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.