टाकळी हाजी : राज्यातील कोकणासह कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यांतील दक्षिण भागात पावसाने थैमान घातले असल्याचे चित्र दिसत असतानाच मात्र दुसरीकडे शिरूर-पारनेर तालुक्याला वरदान ठरलेली कुकडी नदीमात्र ऐन पावसाळ्यात कोरडी पडली आहे. दरम्यान, पाण्याअभावी पिके सुकून चालली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
कुकडी नदी शिरूर व पारनेर तालुक्याला वरदान ठरली असून, ५० गावांची तहान या नदीवर भागते. तसेच शेती पिकते, मात्र गेल्या महिन्यापासून नदीला पाणी नसून नदी कोरडी पडली आहे. कुकडी नदी तीरावर असलेल्या होनेवाडी कुंड पर्यटन क्षेत्र माळवाडी, जांबूत, शरदवाडी, वडनेर बुद्रूक, वडनेर खुर्द, मोरवाडी, परिसर, निघोज या गावांमध्ये विहिरीच्या आणि नदीच्या पाण्यावर जगवलेली पिके पाण्याअभावी सुकत आहेत. परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाईदेखील भासू लागली आहे. ऊस, सोयाबीन, बाजरी, मूग, ताग, भुईमूग, जनावरांचा चारा (मका, घास, ज्वारी) इ. पिके मोठ्या क्षेत्रावर असून येत्या १०-१५ दिवसांत नदीला पाणी आले नाही किंवा पाऊस झाला नाही, तर खरीप पिके सोडून द्यावी लागणार आहेत. कुकडी काठ परिसरात पाऊस कमी झाल्याने बाजरीच्या पेरण्या कमी झाल्या असून, उत्पादनात मोठी घट होणार आहे.
निघोजसारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावात तर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गाव परिसरातील नळपाणी पुरवठा योजना पाण्याअभावी ठप्प झाली असून, दोन दिवसांनी नळाला पाणी सोडण्यात येते. यासाठी कुकडी नदीला पाणी सोडताना गाव व परिसरातील पुष्पावती नदीला पाणी सोडण्यात आल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल. सध्या पावसाळा असूनही उन्हाचे चटके बसत आहेत. यामुळे खरीप पिकांवर याचा परिणाम झाला आहे. लवकरात लवकर कुकडी नदीला तसेच निघोज व परिसरातील पुष्पावती नदीला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर उचाळे, निघोजचे सरपंच चित्रा वराळ पाटील यांनी केली आहे.
२९ टाकळी हाजी
कुकडी नदीला पाणी नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात जगप्रसिद्ध रांजणखळगे कोरडे पडले आहेत.