पुणे : म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल टेनिस सेंटर येथे १ मेपासून आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. राज्यात प्रथमच ही स्पर्धा होत असून, त्याचा मान पुणे शहराला मिळाला आहे. यात कुमार जागतिक क्रमवारीत अव्वल पन्नास खेळाडूंमध्ये असलेले तोरू होरी, युकी नाईतो यांसह १५ विविध देशांतील मानांकित खेळाडू झुंजणार आहेत. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेतर्फे (पीएमडीटीए) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आयटीएफ कॅलेंडरमधील ही सर्वांत महत्त्वाची आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धा म्हणून ओळखली जाते. एमएसएलटीएचे मानद सचिव व स्पर्धा संचालक सुंदर अय्यर यांनी ही माहिती दिली.अय्यर पुढे म्हणाले की, घरच्या मैदानावर ही स्पर्धा होत असल्यामुळे राज्यातील खेळाडूंना आयटीएफ गुण मिळवण्यास मदत मिळणार आहे. साधारणपणे या ग्रेडच्या स्पर्धा खेळण्यासाठी एक ते दीड लाख रुपये इतका खर्च येतो. मात्र, आमच्या विनंतीला मान देऊन एआयटीएने या स्पर्धेला मान्यता दिल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना महत्त्वपूर्ण गुण मिळवण्याची संधी असेल. या स्पर्धेमुळे आशिया खंडातील खेळाडूंना आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जागतिक क्रमवारीत आपले स्थान उंचावण्याचीदेखील संधी मिळते. तसेच, यातून आशियाई खेळाडूंना फ्रेंच ओपन, विम्बल्डन, यूएस ओपन यांसारख्या ग्रँण्डस्लॅम स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.अशाच स्पर्धांमधूनच भारतीय टेनिसला लिऐंडर पेस, महेश भुपती, हर्ष मंकड, करण रस्तोगी, संदीप कीर्तने, युकी भांब्री, सानिया मिर्झा, ईशा लखानी, ऋतुजा भोसले, स्नेहादेवी रेड्डी यांसारखे अव्वल खेळाडू लाभले आहेत. भारताची अव्वल कुमार खेळाडू प्रांजला येडलापल्लीने गतवर्षीचे विजेतेपद पटकावून द्वितीय मानांकन मिळवले होते. या वर्षीदेखील ती आपल्या कामगिरीत सातत्य राखेल, अशी अपेक्षा आहे. विजेत्या खेळाडूला १८०, तर उपविजेत्या खेळाडूला १२० आयटीएफ गुण मिळणार आहेत. उपांत्यफेरीतील खेळाडूंना ८०, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना ६० व उप-उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना ३० गुण देण्यात येणार आहेत. दुहेरी गटातील विजेत्या खेळाडूंला १२० आयटीएफ गुण, उपविजेत्या खेळाडूंला ८० व उपांत्यफेरीतील खेळाडूंना ६० गुण देण्यात येतील. उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना ३० गुण दिले जाणार आहेत.४मुख्य फेरीतील मुलांच्या गटातील अव्वल खेळाडूंमध्ये फिलिपीन्सचा अल्बेर्टो लीम (२५), जपानचा युता शिमीझू (४७), चीनचा लिंगझी झाओ (७५), जपानचा युनोसूके तानाका (९१), चीनचा चेंगझे ल्यु (९८), होंग कोंगचा आॅथोनी जॅकी तँग (१२३) आणि जपानचा नोकी ताजीमा (१२६) यांचा समावेश आहे.४मुलींच्या गटात जपानची युकी नाईतो व भारताच्या येडलापल्ली बरोबरच जपानची मायूका आईकावा (५८), भारताची झील देसाई (७७), चीनची झीमा दू (७९), तायपेईची यांग ली (१०३), इंडोनेशीयाची रीफंती काफीयानी (११०), आणि भारताच्या महक जैन(११५) यांचा समावेश आहे.
पुण्यात रंगणार कुमार आयटीएफ टेनिस
By admin | Published: April 29, 2016 2:50 AM