भिगवण : ऑनलाईन मोबाईल, घड्याळे टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळते. परंतु स्थानिक भाजीविक्रेत्याकडून आॅनलाईन भाजी मिळते हे ऐकायला नवल वाटतंय ना. मात्र हे खरे करून दाखवले आहे कुंभारगाव येथील कुंडलिक धुमाळ या प्रग्ाितशील शेतकऱ्याने. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून परिसरातील ग्राहक विषमुक्त भाजीपाला खरेदी करीत आहेत.आजच्या काळात शेती करणे तोट्याचे असल्याचे म्हटले जाते. तर काही पीक पद्धतीतून रासायनिक खते आणि औषधावर केलेला खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकू लागल्याची आणि कर्जाच्या डोंगरामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. मात्र काही शेतकरी आपल्या कल्पकतेतून शेती व्यवसायसुद्धा फायदा मिळवून देतो याचे उदाहरणासह दाखवून देतात. कुंभारगाव येथील माजी सरपंच कुंडलिक धुमाळ यांनी आपल्या शेतात अनेक प्रकारच्या विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला लावून त्याचे मार्केटिंग केले आहे. त्यासाठी धुमाळ यांनी मोबाईल व्हॉट्सअॅपवर आपल्या ग्राहकांचा ग्रुप बनवून त्यावर रोज कोणत्या भाज्या उपलब्ध आहे, याची माहिती देण्यात येते. इतकेच काय त्या भाजीचा फोटो टाकण्यात येतो. त्यामुळे या ग्रुपवरील महिला सदस्या आवश्यक असणाºया भाजीची आॅर्डर देतात. त्यामुळे कोणाला कोणती भाजी पाहिजे त्याप्रमाणे ही भाजी पोहचविण्याची व्यवस्था केली जाते. यात धुमाळ यांना त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी या संपूर्ण कुटुंबाची मदत मिळते. या ग्रुपवर विशेष करून भिगवण येथील वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर, मेडिकल व्यावसायिक आणि वकील यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. तर आजच्या काळात रासायनिक औषधामुळे विषयुक्त भाजीपाला पिकविला जात असताना धुमाळ मात्र सेंद्रिय भाजीपाला पिकविणे आणि विकणे याकडे लक्ष केंद्रित करीत असताना दिसून येत आहेत. यामुळे शेतीमध्ये नफा नाही म्हणणाºया शेतकºयांसाठी हे उत्तम उदाहरण असल्याचे नक्कीच मानता येईल.
कुंभारगावचा शेतकरी विकतो ऑनलाईन भाजीपाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 2:05 AM