पिंपरी : दिवसभर घरातून बाहेर पडावेसे वाटत नाही. स्वेटर तर चोवीस तास अंगातच घातलेले, असे चित्र शहर परिसरातील मध्यमवर्गीयांमध्ये दिसत आहे. दुसरीकडे दिवसभर राब राब राबून निवाऱ्याची सोय नाही. त्यामुळे धरणीचे अंथरुण आणि नभाचे पांघरुण घेऊन अनेकांना पदपथावर थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागत आहे. या नागरिकांना मायेची ऊब देऊन त्यांचा थंडीपासून बचाव करण्याची आवश्यकता आहे. शहरात आठ- दहा दिवसांपासून थंडीची लाट आहे. अगदी दिवसाही स्वेटर, शाली पांघरताना नागरिक दिसत आहेत. मात्र, रस्त्यावर राहणाऱ्यांना पहाटेची जीवघेणी थंडी गोणपाटाच्या तुकड्यांच्या आधारावर काढण्याशिवाय पर्याय नाही. चिंचवड, लिंक रस्ता, नाशिक फाटा, डांगे चौक, निगडी पूल, भक्ती-शक्ती, रावेत, किवळे, यमुनानगर, साने चौक, मोरया रुग्णालय, चापेकर पूल, वाल्हेकरवाडी, वाकड चौक अशा विविध ठिकाणी ‘लोकमत’च्या टीमने पाहणी केली. राज्यातील आणि परराज्यांतील नागरिक कामाच्या शोधात पिंपरी- चिंचवड शहरामध्ये आले आहेत. त्यांना या शहराने जगण्याचा आधार दिला; मात्र या शहरात त्यांना निवारा मिळू शकला नाही. त्यामुळे रस्त्यावरचे पदपथच त्यांचा आधार बनले आहेत. गावात कामधंदा मिळत नाही, म्हणून शहराकडे धाव घेतली. यातील बहुतांश कचरा वेचून आपली उपजीविका करतात. महापालिकेच्या पुलाखाली रात्रीच्या वेळी निवारा शोधणाऱ्या एका महिलेचे हे घरच बनलेय. २० वर्षांपासून कचरा गोळा करून मिळणाऱ्या पैशातून जगणेही अवघड. त्यामुळे साधी झोपडीही त्यांना कधी मिळू शकली नाही. सोबत राहणारे बदलत गेले.रस्त्यावर राहणाऱ्या एका कुटुंबात छोटी मुलेही दिसली. स्वेटर, मफलर सोडाच; त्यांच्या अंगावर धड कपडेही नव्हते. चार काठ्या उभ्या करून केलेल्या पालात ही मुले झोपलेली. रात्री अकरा-बारापर्यंत छोटीशी शेकोटी करून ऊब घ्यायची आणि रात्र कशीबशी काढायची. रस्त्यावर पडलेलाच कचरा गोळा करायचा आणि त्याचीच शेकोटी पेटवायची. - संकलन : अमोल जायभाये, अतुल मारवाडी, नवनाथ कापले.
थंडीत कुडकुडणा-यांना हवी ‘मायेची ऊब’
By admin | Published: December 22, 2014 5:25 AM