पुणे : बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी पाळलेला बकरा लंपास करणाऱ्या समर्थ पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली आहे. ताफिम बेग (रा. मंगळवार पेठ) असे बकरा चोरी करणाऱ्याचे नाव आहे. हा चोरीचा बकरा सानियन जातीचा असून, त्याची बाजारात किंमत २५ हजार एवढी होती. चोरीच्या बकऱ्याची तो बाजारात विक्री करणार होता. मात्र त्या अगोदरच पोलीस त्याच्यापर्यत पोहचले आणि त्याचा डाव फसला.
या प्रकरणी यासर काझी (रा़ नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़ समर्थ पोलिसठाण्याचे सहायक पोलिस उप निरीक्षक शेट्टीबा शिंदे, पोलीस शिपाई पेरणे व मोरे हे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हद्दीत पायी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना एक व्यक्ती घाईगडबडीत उच्च प्रजापतीचा बकरा घेऊन नरपतगिरी चौकातून निघाला होता. पोलिसांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी बकरा घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला थांबवले. त्याच्याकडे बकऱ्याबाबत विचारणा केली़ तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़. त्यामुळे पोलिसांना आणखी संशय आल्याने त्यांनी सखोल चौकशी सुरु केली़ तेव्हा त्याने बकरा नाना पेठेतून चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बकरा मालकाचा शोध घेण्यात आला असता यासर काझी (रा. नाना पेठ) यांनी त्यांचा बकरा चोरीस गेल्याचे सांगितले. बेग यालान्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गद्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, सहायक उपनिरीक्षक शेट्टिबा शिंदे, पोलिस शिपाई हेमंत पेरणे, सुभाष मोरे यांच्या पथकाने केली.