अंकुश जगताप, पिंपरी लग्नकार्यात डीजेचा दणदणाट आणि नवरदेवांच्या निघणाऱ्या वरातीवर निर्बंध व नियमोल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय हरित लवाद न्यायालयाने दिला आहे. परिणामी, डीजे व्यावसायिक व बॅँडपथकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.मंगल कार्यालये व लॉनवर होणाऱ्या लग्न समारंभातील ध्वनिप्रदूषणाबाबत पुण्यातील सुजल गृहनिर्माण सहकारी संस्थेने हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे. त्यानुसार ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या डीजे व वरातीप्रकरणी संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम १९-२ अन्वये कारवाई करावी. पोलिसांनी अशा कारवाईत साधने जप्त करावी, असे या आदेशात स्पष्ट केले आहे. डीजेच्या जोरदार आवाजाच्या तालावर काढल्या जाणाऱ्या वराती हा धार्मिक अथवा सांस्कृतिक भाग असूच शकत नाही. त्यामुळे नवरदेवाने २० - २५ वऱ्हाडींसह देवळात शांततेने दर्शन घेऊन येणे गरजेचे आहे. त्यासाठीही पोलिसांची परवानगी घेण्याचे बंधन घातले आहे.
‘डीजे’ व्यावसायिकांवर कुऱ्हाड
By admin | Published: April 13, 2015 6:19 AM