पुणे : कुरकुंभ येथील एमडी ड्रग्ज बनवणारा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर पुणेपोलिसांनी पश्चिम बंगाल येथील मालदा येथून आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. सुनील बर्मन असे या संशयिताचे नाव असून, त्याला लवकरच पुण्यात आणण्यात येणार आहे.
बर्मन हा ड्रग्ज तस्करीतील मास्टरमाईंड संदीप धुनिया व अन्य मुख्य आरोपींच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी पुणे पोलिसांनी वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (३५, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (४०, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भीमाजी परशुराम साबळे (४६, रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (४१, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम, मुंबई) तर दिल्ली येथून दीवेश भुतीया (३९) आणि संदीप कुमार (४२, दोघेही रा. दिल्ली), आयुब अकबर मकानदार (रा. सांगली) यांना अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी मंगळवारी (दि. २७) पश्चिम बंगाल येथून सुनील बर्मन नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याचा या प्रकरणात मोठा सहभाग आढळल्यास त्याला या प्रकरणात अटक होण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे. सुनील बर्मन हा सात फरार आरोपींपैकी एक असून, तो यापूर्वी पुण्यात येऊन गेला होता. तो सातत्याने इतर आरोपींच्या संपर्कात होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.