कुरकुंभ- रासायनिक कंपनीला आग लागल्याने पसरलेल्या दहशतीमुळे कुरकुंभ गावासह वाड्यावस्त्या मध्यरात्री रिकाम्या झाल्या आहेत. मिळेल त्या वाहनाने ग्रामस्थ गाव सोडून पळत आहेत. सुमारे 10 ते 15 किलोमीटरच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. रात्री दहा वाजता लागलेले आग बारा वाजेपर्यंत आटोक्यात आलेली नाही. पुणे, बारामती येथूनही अग्निशमन दलाचे बम्ब रवाना झाले आहेत. पण आगीच्या ठिकाणी होत असलेले स्फोट आणि परिसरातील रासायनिक कंपन्या यामुळे ग्रामस्थ प्रचंड दहशतीत आहेत. त्यामुळे स्वतःची वाहने किंवा मिळेल त्या मार्गाने परिसर सोडून जात आहेत. इतरत्र आग पसरू नये म्हणून आग लागलेल्या कंपणीच्या परिसरातील इतर कंपन्यांवर पाणी फवारले जात आहे. पुणे सोलाऊर महामार्ग बंद करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. त्यातच अफवा पसरत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
दरम्यान आग आटोक्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणाने बंद करण्यात आलेला पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लवकरच चालू केला जाईल अशी माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. परिसरातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.