--
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पाच कोटींची कुरुळी टॅपिंग ते आळंदी पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार महिन्यात शहराला शुद्ध पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या भामा - आसखेड जलवाहिनी योजनेच्या कुरुळी येथील जॅकवेलमधून टॅपिंग करून आळंदी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटींची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. सध्या शेवटच्या टप्प्यातील चिंबळी (ता.खेड) भागात काम सुरू आहे. सोमवारी (दि.३१) पालिकेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया, मुख्याधिकारी अंकुश जाधव, पाणीपुरवठा विभागप्रमुख अक्षयकुमार शिरगिरे आदींनी कामाची पाहणी केली.
याप्रसंगी रवी वावरे, मयूर गोरे, रोहन देशमुख आदी उपस्थित होते.
दरम्यान, सदरची योजना मार्गी लावण्यासाठी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया अथक मेहनत घेत आहेत. अनेक ठिकाणी आलेल्या अडथळ्यांवर त्यांनी स्वतः मार्ग काढत यशस्वी शिष्टाई केली. काही ठिकाणी स्थानिकांना विश्वासात घेऊन आळंदीकर यांची पाण्याची गरज निदर्शनात आणून दिली. चिंबळी, केळगाव येथील विरोधाचा सामना करत त्यावर तोडगा काढला आहे. पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची धडपड पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.
--
मागील अनेक दिवसांपासून तीर्थक्षेत्र आळंदीला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. स्थानिक नागरिकांना गटारगंगा झालेल्या इंद्रायणीच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. परिणामी, आळंदीतील स्थानिक नागरिक विकत पाणी घेऊन आपली तहान भागवत आहेत. मात्र, होऊ घातलेली पाणीपुरवठा योजना यशस्वी सुरू झाल्यानंतर आळंदीतील पाण्याचा वनवास संपला जाईल, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.
फोटो ओळ : आळंदी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या कुरुळी टॅपिंग योजनेच्या खोदकामाची पाहणी करताना आळंदी नगरपरिषदेचे पदाधिकारी. (छाया : भानुदास पऱ्हाड)